विदर्भ दौरा : शेतकऱ्यांना सिंचनाची प्रतीक्षाभंडारा : महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द आणि बावनथडी प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर उच्चाधिकार असलेली २९ सदस्यीय ‘अंदाज समिती’ मंगळवारला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ही समिती या दोन्ही प्रकल्पाचे सुक्ष्म निरीक्षण करुन राज्य सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. या समितीचे अध्यक्ष जालनाचे आमदार अर्जुन खोतकर हे असून या समितीत तुमसरचे आमदार चरण वाघमारे हे सदस्य आहेत. १६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करुन या प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन गोसेखुर्दसाठी ७०० कोटी रुपये तर बावनथडीसाठी १२० कोटीचा निधी घोषित केला. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकल्पांना भेट देऊन या योजना पूर्ण होण्यासाठी आणखी किती रुपयांची गरज आहे, याची पाहणी करण्यासाठी ‘अंदाज समिती’ला दौरा करण्याचे निर्देश दिले आहे. या समितीचा दौरा गोपनीय ठेवण्यात आला असून ही समिती ८ सप्टेंबर रोजी बावनथडी ता. तुमसर, गोसीखुर्द ता. पवनी, धापेवाडा ता.तिरोडा आणि ९ सप्टेंबर रोजी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)मार्चपर्यंत निधी मिळण्याची शक्यतातुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण झाला असला भूमी संपादनाचा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही . ११९ शेतकऱ्यांना भूमी संपादनासाठी ७२ कोटी रुपयांची गरज आहे. अपूर्ण कामांसाठी ११ कोटी आणि प्रस्तावित कामांसाठी ३७ कोटी असे एकूण १२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्प आणि ‘स्पिल-वे’ पूर्ण झाला आहे. धरणात जलसाठा करण्यात येत आहे. परंतु बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन निधीअभावी रखडले आहे. या प्रकल्पाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ७०० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा निधी मार्चपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.अंदाज समितीची मी सदस्य असल्यामुळे या समितीला बावनथडीचा दौरा करण्याची विनंती केली होती. या दौऱ्यामुळे बावनथडी प्रकल्पाच्या कामाला वेग येईल. शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल. प्रलंबित कामांचा निपटारा होईल. पर्यायाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, यासाठी मी प्रयत्नशील आहे.- आ.चरण वाघमारे,सदस्य, अंदाज समिती.
अंदाज समिती आज करणार गोसेखुर्द, बावनथडीची पाहणी
By admin | Published: September 08, 2015 12:26 AM