मुखरु बागडेलाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील पावसाचे प्रमाण अधिक असले तरी मार्च महिन्यानंतर नदी नाले कोरडे पडतात. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भंडारा जिल्ह्याला नवीन नाही. नदी काठावरील गावांनासुद्धा लीटरभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही टंचाई दूर करण्याकरिता महत्त्वाकांक्षी जलसाठे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. पालांदूर जवळील मऱ्हेगाव ते खोलमारा घाटावर इटियाडोहचे पाणी शेत शिवारातून आल्याने भूजल पातळीसह पशुपक्ष्यांना ही मोठा आधार ठरला. शेतकऱ्यांनाही पीक वाचविण्याकरिता जलसाठ्यातील पाण्याची मोठी मदत शक्य आहे.पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात १,००० मिलिमीटरच्यावर पाऊस कोसळतो. एवढा पाऊस ज्या भूमीत झाला तेथील पाणी पातळी निश्चितच समाधानकारक असते. पावसाळ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून उन्हाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना टप्प्याटप्प्याने सोडल्यास शेतीसह मुक्या जनावरांनासुद्धा मोठा आधार होतो. चूलबंद नदी घाट संपूर्णतः कोरडे झालेले आहे. गत महिन्याभरापासून चूलबंद खोरे संकटात आहे. सर्वच पिके चूलबंद खोऱ्यात उत्पादित होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेती पंपाच्या माध्यमातून सिंचन सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी संकटात येऊन शेत पिके निश्चितच समस्यात आहेत.भंडारा जिल्ह्यात साकोली शेजारील चूलबंद नदीवर निम्न ूचूलबंद प्रकल्प आहे. त्यातून कित्येक गावांची तहान भागविली जाते. त्या पाण्याचा लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील चुलबंद खोऱ्यातील गावांना होऊ शकतो. कोरड्या पडलेल्या जलवाहिन्या पुनर्जीवित होऊ शकतात. पशू पक्ष्यांसह जनावरांनाही मोठा आधार मिळू शकतो. किमान एप्रिल व मे या महिन्यात निम्न चूलबंदचे व गोसेखुर्द प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन चे पाणी चूलबंद व तिला मिळणाऱ्या नाल्यांना सोडल्यास शेतीसह सर्वांना मोठा दिलासा मिळू शकतो.
चूलबंद नदी काेरडी- चूलबंद नदीला कोरड पडली आहे. अमाप रेती उपसानेही पाणी पातळी खालावलेली आहे. निम्न चूलबंद चे व गोसेखुर्द अंतर्गत नेरला लिफ्टचे पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे. जल साठ्यातील पाणी चूलबंदला मिळाल्यास कित्येक गावे उन्हाळ्याच्या दिवसातही पाणीदार होतील हे विशेष!