त्यानुषंगाने कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करता राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व शाळांमधील इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विषय शिक्षकांच्या समितीचे गठन करून इयत्ता नववी व इयत्ता अकरावीमधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्यांमधील, प्रात्यक्षिकांमधील, अंतर्गत मूल्यमापनातील अथवा विद्यार्थ्यांना विषयनिहाय चाचण्या घरी सोडविण्यास देऊन अथवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून त्या आधारे विद्यार्थ्यांना गुणांकन देण्याचा निर्णय शाळास्तरावर घेण्यात यावा. मात्र, असे करत असताना इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे बंधन शाळांवर राहील असे नमूद करण्यात आले आहे .
इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगळ्या सत्र नोंदी न करता सदर समितीने विचारात घेतलेल्या मूल्यमापन साधनांमधील विषयनिहाय प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित पद्धतीने गुणपत्रक तयार करणे अत्यावश्यक आहे.
हा निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अनुषंगाने संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांचे पत्रान्वये घेण्यात आला. ८ एप्रिलला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आले. या निर्णयाचा राज्यातील वर्ग नववी व अकरावीत शिकणाऱ्या ३१ लाख २० हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.