भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा अपडेट होईल अशी सर्वांना आशा होती. मात्र ग्रामीण आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्रावर या भीषण घटनेनंतरही मनमर्जी सुरू आहे. येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रावर पोहोचत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यातील १४६ आरोग्यवर्धनी केंद्रांतर्गत असलेल्या शेकडो रुग्णांना त्याचा फटका बसतो आणि थेट भंडारा गाठावे लागते.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवार, ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. त्यात दहा चिमुकल्यांचा प्राण गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र काही अपवाद वगळता वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमर्जी पाहायला मिळत आहे. आरोग्यवर्धनी केंद्र ग्रामीण आरोग्याशी निगडित आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाते. त्यातून त्यांना उपचाराची दिशा मिळते. भंडारा जिल्ह्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांची नियुक्ती असते. काही ठिकाणी नर्सिंगमध्ये पदवी असलेल्या उमेदवारांची वर्णी लावली जाते. येथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडानंतर दोन-तीन दिवस सर्व कर्मचारी आपल्या नियुक्त ठिकाणी दिसत होते. परंतु आता पुन्हा पूर्वीसारखीच स्थिती झाली आहे. बहुतांश केंद्रावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची ग्रामीण रुग्णांची ओरड आहे. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घ्यावी लागते. तेथेही अशीच स्थिती असते. परिणामी ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या रुग्णांना पदरमोड करून भंडारा गाठावे लागते. भंडारा जिल्हा रुग्णालय घटनेनंतर अपडेट झाले असले तरी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांकडे पाहण्याची मानसिकता येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत बदलल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आरोग्यवर्धनी केवळ पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. अग्निकांडाच्या घटनेनंतर या केंद्राचेही ऑडिट होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
बॉक्स
ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडे सुविधांचा अभाव
जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि १४६ आरोग्यवर्धनी केंद्र आहेत. येथे सुरुवातीपासूनच सुविधांचा अभाव दिसत आहे. येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने कुणावर वचक नाही. औषधांचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते. वेळेवर औषधी न मिळाल्याने रुग्ण दगावल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतरही आरोग्य यंत्रणा बोध घ्यायला तयार नसेल तर याला शोकांतिकाच म्हणावी लागेल.