रेेंगेपारवासीयांचा आरोप : आवश्यकता नसतानाही अंदाजपत्रकात केली तरतूदलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील मामा तलाव विशेष दुरूस्तीला सन २०१५-१६ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटत असतानाही काम ठप्प असल्याचा आरोप रेंगेपार कोहळीवासीयांनी केला आहे.पाणीवाटप समितीचे सचिव विनायक मुंगमोडे यांनी याबाबत लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार, शाखा अभियंता लाखनी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात मुंगमोडे यांनी आरोप लावताना रेंगेपार (कोहळी) येथील मामा तलाव दुरूस्तीला लघु पाटबंधारे विभागाने सन २०१५-१६ मध्ये विशेष दुरूस्ती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सदर कामाची ई निविदा मागवून काम वाटप करण्यात आले आहे. यानंतरही आजतागायत सदर काम करण्यात आले नसल्याचा आरोप मुंगमोडे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.राज्य शासनाने जलयुक्तशिवार योजनेअंतर्गत गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, संकल्पना राबविली आहे. यातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी हा मुख्य उद्देश. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील मामा तलावाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिके वाचविण्यासाठी पाणी मिळणार नसल्याने अडचण निर्माण होणार आहे.मामा तलाव विशेष दुरूस्तीसाठी बनविण्यात आलेल्या अंदाजपत्रकातही दोष आहे. तलावाचे वेष्ट वेअर मोठ्या प्रमाणात फुटलेला असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने पिके पाण्याअभावी करपतात. यासोबतच नहराला फुटवेअरची गरज असतानासुद्धा अंदाजपत्रकात फुटवेअरची तरतूद केली नाही. तलावाचे पाणी शेत पिकविण्याकरीता वाटप करताना शेतात न जाता नहराच्या फुटलेल्या भागातून पाणी नाल्याला मिळते. त्यामुळे फुटवेअरची तरतुद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तलावाच्या नहर दुरूस्तीच्या कामाकरीता कसल्याही प्रकारची व्हीआरडी गरज नसतानाही अंदाजपत्रकात तीन व्हीआरबीचा समावेश केलेला आहे. तसेच चार आऊटलेटची गरज असताना १२ आऊटलेट अंदाजपत्रकात समाविष्ठ केल्या असल्याची बाबही समोर आली आहे. सदर अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या कामांचा समावेश करून निधीचा दुरूपयोग न करता तातडीने काम पुर्ण करावे, अशी मागणी रेंगेपारवासीयांनी केली आहे. याबाबत त्यांनी १० जूनला आमसभा घेऊन त्यात हा निर्णय घेतला आहे.
पावसाळा लागूनही मामा तलाव दुरूस्ती ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 1:24 AM