सिरसी येथे २००८-०९ मध्ये योजना मंजूर करण्यात आली हाेती. त्याअंतर्गत ३९ लाख ९९ हजार इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले हाेते. या याेजनेवर ३८ लाख ४८ हजार रुपये खर्च करून पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली. ग्रामपंचायतीअंतर्गत निविदेद्वारे साहित्य खरेदी केली. त्यानुसार पाइपची गुणवत्ता अतिशय चांगली आहे असे नमूद करण्यात आले हाेते. मात्र तरीही २०११ पासून ही पाणीपुरवठा याेजना बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे काही जणांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार सदर याेजनेवर देखभाल दुरुस्तीवरील खर्च दस्ताऐवजात उपलब्ध नाही, असे नमूद करण्यात आल्याचे माहिती मिळाली आहे. शासनाकडून लाखाे रुपये पाणी याेजनेसाठी मंजूर केले असतानाही दरवर्षी गावात पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे येथील पाण्याची टाकी एक शाेभेची वास्तू ठरत आहे. यासाठी अनेकदा प्रशासनाकडे ग्रामपंचायततर्फे जिल्हा परिषद प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. याला अनेक दिवसांचा कालावधी लाेटला असताना प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांच्या निवदेनाची दखल घेत पाण्याची समस्या लवकरात लवकर दूर करावी व शासकीय पैशांचा याेग्य वापर करून ताेडगा काढावा, अशी मागणी हाेत आहे.
बाॅक्स
शासनाच्या उद्देशाला हरताळ
एकीकडे शासन ग्रामीणस्तरावर सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते तसेच इतर साेयी-सुविधा देण्यासाठी थेट ग्रामपंचायतींना माेठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करीत आहे, तर दुसरीकडे दर्जेदार गुणवत्तापूर्ण कामे हाेत नसल्याने आजही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून गावपातवळीवर हाेणारी कामे दर्जेदार आहेत का? याची शाेधमाेहीम राबविण्याची गरज आहे.