बेपत्ता होण्याचे गुढ कायम : आता उरल्या ‘जय’च्या केवळ आठवणी पवनी : अवघ्या देशाला भुरळ घातलेला ‘जय’ नामक वाघ वर्षभरानंतरही बेपत्ताच असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. १८ एप्रिल २०१६ रोजी त्याचा शेवटचा अधिवास दिसल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. या घटनेला आज वर्ष झाले. वन विभाग, व्याघ्र प्रकल्प, राज्य शासनातर्फे ‘जय’ला शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. परंतु ‘जय’चा शोध लागला नाही. जय विषयी वनविभागानेही मौन बाळगले आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमिटरचे अंतर कापून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये ‘जय’ आला होता. तेव्हा तो तीन वर्षाचा होता. काही दिवसातच ‘जय’ या अभयारण्याचा हिरो ठरला होता. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवसापर्यंत आॅनलाईन बुकींग राहत होती. शेकडो पर्यटकांना प्रतीक्षा यादीवर राहावे लागत होते. ‘जय’ला पाहण्यासाठी अनेक सेलीब्रीटींनीही हजेरी लावली होती. भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, विलक्षण चपळाई आदी गुणांमुळे ‘जय’ हा पर्यटकांना येथे भुरळ घालत होता. अल्पावधीतच ‘जय’ने या अभयारण्यात साम्राज्य निर्माण केले होते. येथे ‘जय’चा दरारा होता कोणताही वाघ हा १०० चौ.कि. मी परिसरात फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमिटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० कि.मी. वर अशा २५० कि.मी. जंगलात फिरत होता. ‘जय’ला अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्रात आठ दिवस तर आठ दिवस अभयारण्याच्या भिवापूर, उमरेड, कऱ्हांडलाच्या जंगलात राहात होता. गोसीखुर्द धरणाच्या जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरलेली असताना ‘जय’नदीत पोहून जात होता. ‘जय’ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभिड, ब्रम्हपुरीपर्यंत वाढविले होते. ‘जय’ने माणसांवर कधीही हल्ला केला नाही.पण ‘जय’ २०१६ मध्ये अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली. ‘जय’च्या पाऊलखुणा पवनीजवळील बेटाळा शिवारात आढळून आल्या. ‘जय’ला लावण्यात आलेल्या कॉलर आयडीची ही अखेरची नोंद ठरली. तो कुठे गेला? त्याचे काय झाले? यावर तर्क वितर्क लावू लागले होते. दुसरीकडे वनविभागाने मिशन ‘जय’ सर्च मोहिमेवर सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जीपीएस अनुसार ‘जय’ १८ एप्रिल २०१६ ला आढळून आला होता. विशेष म्हणजे जय हा आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात ‘जय’च्या पायाचे ठसे आढळून आले होते. तेथून दोनशे फुटावर पवनी नागपूर डांबरीकरणाचा रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ ला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रातील डोंगर महादेव परिसरातील जंगलातील शेळ्या पिपरी बोडीत गरमीपासून थंडावा मिळण्याकरिता पाण्यात आनंद घेताना पर्यटकांना दिसला. तो शेवटचा. त्यानंतर जय कधीही दिसला नाही. ‘जय’चा प्रवेश झाला तो पवनीच्या जंगलातून जय नाहीसा झाला तो पवनीच्या जंगलातून. ‘जय’ बेपत्ता होण्याचे गुढ एक वर्षापर्यंत वनविभागाला उकलता आले नाही. ‘जय’ बेपत्ता होण्याचा परिणाम पर्यटनावर झाला. आता ‘जय’च्या केवळ आठवणी उरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
वर्षभरानंतरही लागेना ‘जय’चा शोध
By admin | Published: April 19, 2017 12:25 AM