मोहाडी : दहावीपर्यंत कोणत्याही शाळेत आता टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) नसल्यावर वयाचा दाखला बघून प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे टीसी मिळविण्यात अडचण आलेल्या किंवा टीसी नसलेल्या विद्यार्थ्यांना सरळ वयानुसार दहावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गात प्रवेश मिळणार आहे.
पूर्वी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसीची आवश्यकता होती. एखादा मुलगा अथवा मुलगी विपरीत परिस्थतीमुळे खासगी शाळेची फी भरू शकला नाही किंवा इतर काही कारणांमुळे त्याला टीसी प्राप्त करण्यात अडचण आल्यास त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत टीसीअभावी सरळ प्रवेश मिळत नव्हता. तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होता. शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. हा कायदा येऊन जरी १२ वर्षे लोटले असले तरी पूर्णपणे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढून सर्व विद्यालयांना टीसी नसतानाही त्याच्या जन्मदाखल्याच्या वयोमानानुसार त्या विद्यार्थ्याला कोणत्या इयत्तेत प्रवेश देता येईल हे निश्चित करून प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.
३१ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की आरटीई अधिनियमातील कलम-४ अन्वये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. कलम १४(१) नुसार वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख त्या कायद्यात आहे. तरी अनेक शाळा टीसी नसल्यावर प्रवेश नाकारत होते. त्या विद्यार्थ्यांचे ते शैक्षणिक वर्ष वाया जात होते. त्यामुळे शासनाने पुन्हा आदेश काढून राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत एखादा विद्यार्थी प्रवेश मागत असेल तर प्रवेश नाकारू नये व या बाबतीत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्याला तात्पुरता प्रवेश देऊन पुढील आवश्यक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे.
बॉक्स
मुख्याध्यापकासह शाळेवरही होणार कारवाई
प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापकावर, शाळेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे या आदेशात नमूद आहे, त्यामुळे टीसी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात आता अडचण येणार नाही. यामुळे आता टीसी उपलब्ध नसल्यावरही कोणताही विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो.