लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नगर पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या अनेक दिग्गजांच्या अपेक्षेवर गुरुवारी झालेल्या सुधारित आरक्षण सोडतीने पुन्हा पाणी फेरले. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सोडतीवर आक्षेप घेतल्याने पुन्हा गुरुवारी नव्याने सोडत काढण्यात आली. त्यात १९ गटांच्या आरक्षणात बदल झाले.जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. या सोडतीत १९ गटांमध्ये बदल झाला आहे. त्यामध्ये तुमसर तालुक्यातील सिहोरा आणि गर्रा गट आता नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाले आहे. पूर्वी हा गट नामाप्रसाठी आरक्षित होता. तुमसर तालुक्यातील येरली हा गट पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी होता, तो आता सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यासोबतच मोहाडी तालुक्यातील कांद्री हा गट नामाप्रसाठी आरक्षित झाला. पूर्वी हा गट नामाप्र महिलांसाठी होता, तर वरठी हा नामाप्रसाठी असलेला गट आता नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाला आहे.साकोली तालुक्यातील पिंडकेपार हा सर्वसाधारण असलेला गट आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे, तर कुंभली हा सर्वसाधारण असलेला गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तुप. हा नामाप्र असलेला गट आता नामाप्र महिला झाला आहे, तर धारगाव हा सर्वसाधारण असलेला गट आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे, तर आमगाव हा सर्वसाधारण महिलांसाठी असलेला गट आता सर्वसाधारण झाला आहे. खोकरला हा सर्वसाधारण असलेला गट सर्वसाधारण महिलांसाठी तर सावरी हा सर्वसाधारण महिलांसाठी असलेला गट सर्वसाधारण झाला आहे. पवनी तालुक्यातील कोंढा हा सर्वसाधारण महिलांसाठी असलेला गट सर्वसाधारण तर ब्रह्मी हा नामाप्र महिलांसाठी असलेला गट नामाप्र झाला आहे. भुयार हा नामाप्र महिलांसाठी असलेला गट नामाप्र तर सावरला आणि मासळ हे दोन सर्वसाधारण असलेले गट आता सर्वसाधारण महिलांसाठी झाले आहेत. दिघोरी गट सर्वसाधारण झाला असून पूर्वी हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता.
सोडतीनंतर ‘कही खुशी, कही गम’
- जिल्हा परिषद निवडणुकीच्या सुधारित आरक्षण सोडतीनंतर ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण दिसत होते. १३ दिवसांपूर्वी १२ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढल्याने अनेक जण कामाला लागले होते. मात्र, आजच्या आरक्षण सोडतीने अनेकांचे गणित बिघडले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनेंद्र तुरकर यांचा सिहोरा हा गट पूर्वी नामाप्र होता. मात्र, आता तो नामाप्र महिलांसाठी राखीव झाला आहे, तर आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतल्यानंतर बदल होईल, अशी अपेक्षा असलेल्या विनायक बुरडे यांचा पालांदूर गट ‘जैसे थे’ म्हणजेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहिला.- शिवसेनेचे नरेश डहारे यांच्या सिल्ली गटातही बदल होईल, अशी अपेक्षा होती, परंतु तेही नामाप्र महिलांसाठीच कायम राहिले. साकोली तालुक्यातील कुंभली हा गट सुरुवातीला सर्वसाधारण असल्याने होमराज कापगते यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, गुरुवारी हा गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. भंडारा तालुक्यातील गणेशपूर गट आरक्षण सोडतीनंतरही सर्वसाधारण राहिल्याने यशवंत सोनकुसरे यांना संधी चालून आली आहे. मात्र, १९ पैकी अनेक गटात फेरबदल झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.