बारव्हा : आधुनिक युगात तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापराने मानवी जीवनशैली बदलत आहे. व्यक्ती आपले श्रम वाचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून सोयी-सुविधा मिळवत आहे. पूर्वी ग्रामीण भागात पीठ तयार करणे, तसेच डाळ भरडाईसाठी दगडाच्या जात्यांचा वापर केला जायचा. शहरी भागातही ज्येष्ठ महिला त्याचा वापर करीत असत; परंतु कालांतराने शहरी भागातून जाते हद्दपार झाले. मात्र, ग्रामीण भागातील जात्याचा वापर अद्यापही कायम आहे. अद्यापही ज्येष्ठ महिला जात्यावर दळण अथवा भरडाईचे काम करताना दिसून येतात.
संयुक्त कुटुंब पद्धती कुटुंबाच्या विकासास पोषक होती. पहाटेपासूनच प्रत्येक सदस्य आपापली कामे करण्यास सुरुवात करायचा. दळण, कांडण यासह विविध कामे पहाटेपासूनच केली जात. महिला दळण व कांडणाचे काम करीत असत. यासाठी पारंपरिक जाते, उखळ असायचे. जाते जमिनीत अर्धवट गाडलेले असायचे, तर उखळ जमिनीत पूर्णपणे गाडलेले असायचे. जवळपास अर्धा ते एक फूट खोल जमिनीत ते असायचे. कालांतराने कांडण्यासाठी लोखंडी खल बाजारात आले. या खलाचाही मोठ्या प्रमाणावर वापर ग्रामीण भागात होताना दिसून येतो. लग्नसमारंभात मसाल्याचे अथवा अन्य पदार्थ कांडण्यासाठी या साहित्याचा वापर केला जातो.
दहा ते वीस वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे पारंपरिक साहित्य वापरले जात होते; परंतु गावागावांत इलेक्ट्रॉनिक मिक्सर तसेच पीठगिरण्या, दालमिल यासारखी यंत्रे पोहोचल्याने पारंपरिक जाते व उखळ कालबाह्य झाले. जुन्या पिढीतील महिला आजही जाते, पाटे व उखळाचा वापर करतात; परंतु नव्या पिढीतील महिला पारंपरिक साहित्याचा वापर करीत नाहीत. त्या कमी श्रम व कमी वेळेत अधिक काम करण्यावर भर देतात. काही महिला श्रम वाचविण्यासाठी गिरणीवर पीठ दळतात, तसेच दालमिलवर भरडाई करतात. शहरी भागात तर याला बगलच दिली जाते.
महिला रेडिमेड वस्तू खरेदीवर अधिक भर देतात. असे असले तरी आजही ग्रामीण भागात पारंपरिक साधनांवर दळण व भरडाईचे काम सुरू आहे. शहरातील नव्या पिढीला ही साधने माहीत नाहीत. त्यांना केवळ चित्र दाखवावे लागते; परंतु ग्रामीण भागात लहान मुलांना त्या साधनांविषयी आपसूकच माहिती मिळते. त्यांना याबाबत विशेष शिक्षण घेण्याची गरज नाही. स्वावलंबनाचे तत्त्व स्वीकारून महिला आजही जात्यावर दळण व भरडाईचे काम करीत आहेत. उन्हाळ्यात तर विविध पदार्थ तयार करण्याकरिता जाते, पाटे व उखळ आदी पारंपरिक साधनांचाच वापर केला जातो.
गीतांची मिळत हाेती साथ
महिला पारंपरिक गीत, गवळणी, लोकगीते, हास्यगीते त्याचप्रमाणे पाळणे गाऊन दळण व कांडणीचे काम करीत असत. गीत गायनामुळे महिलांना एक प्रकारची स्फूर्ती मिळायची, तसेच कामाला वेग यायचा. या काळात अजूनही अनेक पारंपरिक साहित्य जतन केले जाते. त्यामध्ये पाटा-वरवंटा, शेर, पायली, कुडव, मुसळाचा समावेश होता.