भंडारा : आठ वर्षीय चिमुकलीला ठार मारून तणसाच्या ढिगाऱ्यात जाळण्याची घटना होऊन पाच दिवस झाले, तरी अद्याप मारेकऱ्यांचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांचे पथक गावातच तळ ठोकून असून, विविध दिशेने तपास करीत आहे.
साकोली तालुक्यातील पापडा येथील श्रद्धा किशोर सिडाम (८) या चिमुकलीचा जळालेल्या अवस्थेत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळला होता. सोमवारी ती खेळायला गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. आता या घटनेला पाच दिवस झाले, तरी अद्याप श्रद्धाच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस पोहोचले नाहीत. विविध दिशेने तपास करूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
श्रद्धा बेपत्ता झाली होती, त्या सोमवारच्या रात्री पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी पापडा गावाला भेट दिली होती. त्यानंतर मृतदेह आढळून आल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी ते गावात तळ ठोकून होते. गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण, साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर पापडा गावातच तळ ठोकून आहेत. मात्र, अद्याप आरोपींचा सुगावा लागत नाही. दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला तत्काळ अटक करावी यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे.
खुनाचे कारणही गुलदस्त्यात
मजुरी करणाऱ्या परिवारातील आठ वर्षीय श्रद्धाचा खून कुणी केला, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. चिमुकलीला पोत्यात बांधून तणसाच्या ढिगात फेकून नंतर पेटवून देण्यात आले होते. तिचा खून कुणी आणि कशासाठी केला? याचा शोध पोलिस घेत आहेत. परिसरात या घटनेवरून विविध चर्चा ऐकायला येत आहेत.