भंडारा : लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वजण उत्सवाच्या आनंदात असताना रेती चोरांनी मात्र टिप्परसह नदी घाट गाठून रेतीचा अवैध उपसा केला. पोलिसांना हे माहित पडताच त्यांनी संबंधित तिघांना रंगेहात ६ ब्रॉस रेतीसह टिप्पर जप्त करून पहाटे पालांदूर पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील मांगली(बांध) शिवारात करण्यात आली. फिर्यादी पोलिस शिपाई नितेश मलोडे यांच्या तक्रारीवरून पालांदूर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन शंकर हटवार (२६) व महेश मोहन पंचभाई(२७, दोन्ही आसगाव, ता. पवनी) तर, टिप्पर मालक चंदू अनिल तिघरे (२३,वलनी, ता.पवनी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रेतीची अवैधरित्या वाहतूक करणे, हा कायद्याने गुन्हा असला तरीही तस्कर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत आहेत. पालांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ठवकर हे रात्र गस्त तपासणी करीत असताना, त्यांना हायवा टाटा एम.एच. ३६. ए.ए. २२९६ या क्रमांकाच्या टिप्पर मधून सहा ब्रास रेतीची वाहतूक करताना मांगली शिवारात आढळून आला. परवाना मागितला असता तो टिप्पर चालकाजवळ आढळून आला नाही.
टिप्पर मालक चंदू तिघरे यांच्या सांगण्यावरून चालक मोहन हटवार यांनी रेतीची चोरी करून वाहतूक केल्याचे पंचासमक्ष सांगितले. जप्त केलेल्या रेतीची किंमत ३० हजार रुपये तर, टिप्परची किंमत ३० लाख रुपये सांगण्यात येते. एकूण ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. आरोपींवर भादंवीच्या कलम ३७९,३४,१०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार वीरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार राजकुमार गायधने, पोलीस हवालदार ओमप्रकाश दिवटे अधिक तपास करीत आहेत.