युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा दिवाळी उत्सवाच्या काळात विधानसभेची निवडणूक आली. त्यामुळे अनेकांच्या कामकाजाची धावपळ वाढली. त्यातच दिवाळीनिमित्ताने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या गावाची वाट धरत निघून गेले. आता दिवाळीचा सण आटोपल्यानंतर ४ नोव्हेंबरपासून नियमित कामकाजाला सुरुवात होईल, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. परंतु, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील बहुतांश खुर्चा रिकाम्या पाहावयास मिळाल्या. काहीजण सुट्टयांवर तर काही निवडणुकीच्या कामावर असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेत दिवाळी फीवर अद्यापही कायम आहे. दिवाळीला गुरुवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी लक्ष्मीपूजन, शनिवारी गायगोधन आणि रविवारी भाऊबीज होती. त्यामुळे रविवारपर्यंत सुट्टया झाल्यानंतर ४ नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे कार्यालये सुरू झाली. सलग सुट्टया आल्याने बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांचा आठवडाभराचा बेत आखला. ते गुरुवारपासून सुट्टीवर गेले असून, अद्यापही कार्यालयात परतले नाहीत. त्यामुळे मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत शुकशुकाट दिसून आला. हीच परिस्थिती अन्य शासकीय कार्यालयांतही होती.
निवडणुकीच्या कामानिमित्त अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर असल्याचेही सांगण्यात आले. तर काही जणांची निवडणूक कामात ड्यूटी लवकरच लागणार असल्याचे कळविण्यात आले.
कामकाज नावापुरेतच, गप्पाच अधिक दिवाळीसाठी गेलेले अधिकारी य कर्मचारी सुट्ट्या संपवून परतले नाहीत. त्यातच निवडणुकांमुळे अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. परिणामी सर्वसामान्यांचे कामकाज विस्कळीत झाले. जे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले, त्यातील मोजक्याच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. काहीजण गप्पागोष्टीत गुंग होते. काही मोबाइलवर व्यस्त होते, तर काही परिसरात बाहेरील टपरीवर वेळ घालवत असल्याचे दिसले.
कामानिमित्ताने आलेले गेले परत शनिवार व रविवार असल्याने काही अधिकारी व कर्मचारी त्या अगोदरच म्हणजे गुरुवारपासूनच सुट्टीवर गेले. त्यामुळे सोमवारी या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तरी कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. मंगळवारी विविध कामानिमित्त जिल्हा परिषदेतील विविध कार्यालयांत नागरिक आलेले दिसून आले. पण, कामे न झाल्याने सायंकाळी निराश होऊन परत गेले.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी घालावे लक्षजिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत ठेवण्याची जबाबदारी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची आहे. मंगळवारला कामकाज सुरु असताना अनेकांच्या खुर्चा रिकाम्या दिसल्या. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी खरंच निवडणुकीच्या कामावर आहेत, की सुट्टयांवर यासंबंधीची पाहणी करणे गरजेचे आहे.