- इंद्रपाल कटकवार
भंडारा : ९ जानेवारी, २०२१ची पहाट आठवली की, काळजाचा ठोका चुकतो. बाळांच्या किंचाळण्याचा आवाज आजही अदृश्य स्वरूपात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भिंतींमधून गुंजतोय. रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता कक्षात पहाटे दोन वाजता लागलेल्या आगीत दहा निष्पाप बाळांचा जीव गेला. त्या घटनेला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होतील. या हृदयद्रावक घटनेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बोध घेतल्याचे दिसत असून, अत्याधुनिक सोईसुविधांनी हे रुग्णालय आता सज्ज होऊ लागले आहे. या कक्षासाठी २८ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असून, चोवीस तास सीसीटीव्हीची नजर आहे.
फायर ऑडिटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
अग्निकांडानंतर पूर्ण जिल्हा रुग्णालयाची सुरक्षाच धोक्यात असल्याची बाब समोर आली होती. आता एसएनसीयू कक्षासह सर्व इमारतींमध्ये फायर एक्स्टिंग्युशर व फायर फायटिंग सीस्टिमचे नियोजन करण्यात आले आहे. बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक यंत्रणेमार्फत काम सुरू आहे. काम पूर्ण होताच, नगरपरिषद प्रशासन ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
३६ बेबी वॉर्मर
राख झालेला एसएनसीयू कक्ष आता पुन्हा नव्या दमाने उभारण्यात आला आहे. पाच कोटींचा खर्च करून हा कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू आहे. इन्क्युबेटरऐवजी ३६ बेबी वार्मर स्थापित करण्यात आले असून, वेळप्रसंगी ५० नवजात बालकांची येथे सुविधा होऊ शकते. रुग्णालयाच्या नवीन इमारतीत १५ बेडचे अत्याधुनिक आयसीयू कक्ष सुरू झाले असून, त्याचा फायदा रुग्णांना होत आहे.
एसएनसीयू कक्ष सीसीटीव्हीच्या नजरेत
अग्निकांड घडले, तेव्हा एसएनसीयू कक्ष सोडून अन्य कक्ष व व्हरांड्यात काय होत आहे, याची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसायची. आता जिथे ‘बेबी वॉर्मर’मध्ये ठेवण्यात येते, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या कक्षात २४ तास परिचारिका तैनात करण्यात आल्या आहेत. रिलिव्हर आल्याशिवाय जाऊ नये, अशी सक्त ताकीदही परिचारिकांना देण्यात आली आहे. फक्त या कक्षासाठी २८ परिचारिकांची नियुक्ती आहे.
दोन वर्षांपूर्वी घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक होती. या घटनेपासून आरोग्य विभागाने प्रत्येक स्तरावर काळजी घेतली आहे. एसएनसीयू कक्षात २४ तास परिचारिकांची ड्युटी लावण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात आहे.- डॉ.दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.