राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर: ऐन वृद्धापकाळातच पतीचा आधार गेल्याने व वयोमानामुळे अधुपना आले. त्यामुळे कामावाचून बेवारस व भुकेने व्याकुळ झालेल्या निराधार आजीच्या मदतीकरीता येथील उपहारगृह चालविणारा तरुण आजीच्या मदतीसाठी धावून आला. त्याने निराधार आजीला मायेची ऊब मिळवून दिली आहे.पंचफुला पटले (७८ ) असे त्या निराधार आजीचे नाव आहे. वृद्ध पंचफुला ही गत ३० ते ३५ वर्षापूर्वी पासून पती पत्नी तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे यार्डात धान्य साफ करण्याचे काम करीत होते. पंचफुला यांना अपत्य नसल्याने मिळेल त्या मिळकतीत दोनवेळेची पोटाची खळगी भरून गरीबीत खितपत पडूनच दोघे पती पत्नी एकमेकांचा आधार बनून सांभाळ करीत होते. दरम्यान त्यांच्या पतीचे वर्षांपूर्वी म्हातारपणामुळे निधन झाले. आजी एकाकी एकटी पडली. पतीच्या निधनानंतर तिने कसेबसे स्वत:ला सावरून बाजार समितीत काही दिवस कामही केले. मात्र वयोमानामुळे तिला दिसनेही बंद झाले. कामही होत नसल्याने तिला कामावरून कमी करण्यात आले. परिणामी तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. ती वेड्यासारखी भिक्षा मागत फिरत होती.अशातच बाजार समितीसमोर चहा नास्ताची लहानशी टपरी चालक शंकर सेलोकर या युवकाची नजर त्या आजीवर गेली. शंकरने तिला दुकानात बोलावून जेवू घातले. त्यानंतर तिने आपबिती सांगिल्याने गहिवरून आलेल्या आजीला दररोज दोन वेळचा जेवण नित्यनियमाने खाऊ घालत होता. एवढेच नाही तर आठवड्यातून दोनदा तर कधी एकदा तिला आंघोळ घालण्याकरीता घरी घेऊन जात असे व तिला नवीन कपडे देत होता. ती आजी शंकरच्या दुकानातच एका कोपऱ्यात झोपत होती. शंकरने अनेक दिवस तिचा सांभाळ केला. मात्र शंकर कामानिमित्त कधी बाहेर गेला की आजीची फरफट होत होती. दरम्यान आजीला काही आधार देता येवु शकतो काय या दृष्टीने शंकरने येथील समाजसेवक अनिल गभने व समाजसेविका मिरा भट यांच्याशी चर्चा केली असता तालुक्यातील मिटेवानी येथे लिलादेवी वृद्धाश्रम असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार आश्रमात जाऊन चौकशी केली व आश्रम चालकाने परवानगी दिल्याने त्या निराधार आजीला तिच्या जीवनावश्यक वस्तू घेऊन वृद्धाश्रमात नेऊन दिले.यावेळी शंकर सेलोकर, अनिल गभने, मिरा भट, अर्चना डुंभरे, कविता सेलोकर, विजू पिंजर,े वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण देशभ्रतार, प्रज्ञेश भवसागर, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. युवकाच्या व समाजसेविकांच्या मदतीने एका निराधार आजीला आधार मिळून मायेची ऊब मिळवून दिल्याने सर्वत्र त्यांच्या कार्याचा कौतुक होत आहे.
आयुष्याच्या सायंकाळी आजीला मिळाली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:39 PM
ऐन वृद्धापकाळातच पतीचा आधार गेल्याने व वयोमानामुळे अधुपना आले. त्यामुळे कामावाचून बेवारस व भुकेने व्याकुळ झालेल्या निराधार आजीच्या मदतीकरीता येथील उपहारगृह चालविणारा तरुण आजीच्या मदतीसाठी धावून आला. त्याने निराधार आजीला मायेची ऊब मिळवून दिली आहे.
ठळक मुद्देलीलादेवी वृद्धाश्रमाने दिला आधार : सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराचे कौतुक