रेल्वे फाटकावर चार दशकांपासून फूट ओव्हर ब्रिज तयार करण्याची मागणी आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने आवश्यक कारवाईची पूर्तता करून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. आता ओव्हर ब्रिजच्या घोषणेला जवळपास दशक उलटूनही कारवाई होत नसल्याचे खंत नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी वृत्त प्रकाशित झाले आणि कुंभकर्णी झोपेत असलेला बांधकाम विभाग जागा झाला.
बॉक्स
अतिक्रमणधारकांना नोटीस
वरठी-मोहाडी-तुमसर मार्गावरील अतिक्रमणधारकांना शुक्रवारी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. फूट ओव्हर ब्रिज निर्मितीसाठी जागा खुली करून देण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र धडकल्याने अनेक अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली आहे. अतिक्रमण हटविण्यास स्थानिकांचा विरोध नाही पण पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाॅक्स
पर्यायी जागा देण्याची मागणी
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे अनेकांनी आपले व्यवसाय थाटले. यासाठी मोठी गुंतवणूक झाली. अतिक्रमण करताना कुणी फिरकून पाहिले नाही. अनेक वर्षांपासून या जागेवर व्यवसाय थाटून उदरनिर्वाह सुरू आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्याबरोबर मुलाबाळांचे शिक्षण यावर अवलंबून आहे. अचानक जागा रिकामी करण्याचे आदेश आल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. दुकाने उठली तर पालनपोषण कसे करायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. आधीच कारोनामुळे कामधंदा बुडाला. लॉकडाऊननंतर आता हळूवार परिस्थिती रुळावर येत असताना अचानक दुकान हटवण्याचा आदेशाने रोजगाराचे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.