लोकमत इम्पॅक्ट
भंडारा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या मोठा बाजार परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारूअड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी छापा मारून कारवाई केली. तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे याबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी कारवाई केली.
विजय कचरु न्यायखोर (५२, रा.संत कबीर वाॅर्ड), सुनील रमेश रामटेके (२८, रा. मोठा बाजारल पटेलपुरा वाॅर्ड) आणि प्रमिला शामसुंदर मस्के (५०, रा.चांदणी चौक भंडारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शहरातील मोठा बाजार परिसरात भरदिवसा खुलेआम दारू विकली जात होती. यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘दम दिल्यावरही दारू विक्री सुरूच’ असे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. मोठा बाजार परिसरात फ्रायफिश, अंडी, ऑम्लेट आदी दुकानांमध्ये अवैधरित्या दारूची विक्री होत होती. आता या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, धर्मेंद्र बोरकर, तुलशीदास मोहरकर, कैलाश पटोले, किशोर मेश्राम, मडामे यांनी केली.