अड्याळ : जीर्ण विद्युत खांब धोकादायक असल्याचे तथा विद्युत खांब बांधून ठेवले जांबाच्या झाडाला, या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, विद्युत विभागाला उशिरा का होईना; पण जाग आली. अड्याळ येथील जामा मस्जीदजवळील जीर्ण विद्युत खांबाच्या ठिकाणी मंगळवारी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथील विद्युत अधिकारी तथा कर्मचारी यांनी त्या ठिकाणी नवीन विद्युत खांब उभा केला व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला आहे; पण खेदाची बाब म्हणजे जामा मस्जीद ते आझाद वॉर्डपर्यंत तथा गावातील इतर ठिकाणचे जी विद्युत खांब जीर्ण झाली आहेत, ती अपघात झाल्यावरच बदलणार का, असाही संतप्त सवाल आज अड्याळ ग्रामवासी करताना दिसत आहेत.
तसेच गावात
काही विद्युत खांब एका बाजूला वळली आहेत, यावरही तत्काळ काम करणे आवश्यक आहे. गावातील विद्युत खांब प्राप्त माहितीनुसार, १९६० ते ७० च्या दशकात लावले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे आणि यापैकी काही विद्युत खांब डागडुजी केली आहेत, आता त्या ठिकाणीसुद्धा नवीन विद्युत खांब खबरदारी म्हणून लावल्याशिवाय पर्याय नाही, ही कामे वेळेच्या आधी, दुर्घटना होण्याची वाट न पाहता केले तर ठीक होणार नाहीतर अपघात निश्चितच होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.
जामा मस्जीदजवळून ते आझाद वॉर्डपर्यंत तथा गावातील अन्य ठिकाणी जीर्ण झालेले तथा ग्रामस्थांच्या घरावरून विद्युत तार गेली आहेत तर काही ग्रामस्थांनी त्यावर उपाय म्हणून आपल्याच घराला धोका होऊ नये म्हणून त्या जिवंत विद्युत तारांना लाकडी टेकणी लावल्याचे गावात ठिकठिकाणी पाहायला मिळणार तर काही ठिकाणी झाडांना स्पर्श करून तारे गेलेली आहेत, याला म्हणायचे काय, हेच कुणाला कळत नाही; त्यामुळे आता तरी विद्युत उपकेंद्र अड्याळ यांनी गावातील गल्लोगल्लीत जाऊन सर्व्हे करून कुठे काय प्रॉब्लेम आहेत, कुठले विद्युत खांब जीर्ण आहेत, याचा पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.
ज्या ठिकाणी विद्युत खांब नवीन बसविण्यात आले आहे आता ज्या-ज्या ठिकाणचे जीर्ण झालेले विद्युत खांब, एका बाजूला झुकलेले, ग्रामस्थांच्या घरावर आलेली विद्युत तार, झाडाला स्पर्श करत गेलेली विद्युत तार यावर विद्युत उपकेंद्र कोणती भूमिका घेणार, याकडेही समस्त ग्रामवासीयांचे लक्ष लागून आहे.