तुमसर : केवळ खर्रा दिला नाही म्हणून एका युवकाला दगडाने ठेचून गंभीर जखमी करण्याची घटना तालुक्यातील पवनारखारी येथे घडली होती. १५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या तरुणाने बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुरुषोत्तम रामसिंग पटले (२८) रा. पवनारा टोली चिचोली असे मृताचे नाव आहे. १९ डिसेंबरच्या रात्री १० वाजता तो जेवण आटोपल्यानंतर शेकोटी पेटविण्यासाठी घरापासून १०० फूट अंतरावर गेला होता. वनविभागाच्या नाक्याजवळ आरोपी चिता धुर्वे हा शेकोटीवर आला होता. त्यावेळी चिताने पुरुषोत्तमला तंबाखूचा खर्रा मागितला. खर्रा दिला नाही म्हणून तेथे असलेला एक दगड पुरुषोत्तमच्या डोक्यात घातला. तेव्हापासून पुरुषोत्तम बेशुद्धावस्थेत होता. त्याला प्रथम तुमसर व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र आता चिता धुर्वे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.