लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान मंगळवारी पार पडले आणि गावपुढाऱ्यांची बेरीज-वजाबाकी सुरू झाली. गावागावांत आकडेमोड सुरू असून, उमेदवारांसह सर्वच पक्षांचे नेते कसे आम्हीच नंबर वन, याचे गणित सांगत आहेत. कोण, कुठे बाजी मारणार याचे आराखडे बांधले जात असले तरी निकालासाठी सर्वांनाच २८ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्तास गुलाबी थंडीत ग्रामीण भागात वातारण चांगलेच तापत आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढले. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह अपक्षही रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या ३९ गटांत २४५ तर पंचायत समितीच्या ७९ गणांत ४१७ उमेदवारांनी निवडणूक लढविली. मंगळवारी जिल्ह्यात ७७.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदान आटोपताच गावागावांत आकडेमोड सुरू झाली आहे. कुणाला, कुठे आणि किती मते मिळली, याची गोळाबेरीज केली जात आहे. त्यावरून कोण जिंकणार याचे आराखडे बांधले जात आहेत. मात्र, सर्वच उमेदवार आपणच विजयी होऊ, असे छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र सर्वांना दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीनंतर मतमोजणीच्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निकालासाठी २८ दिवसांची दीर्घ प्रतीक्षा- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक झालेल्या उमेदवारांना निकालासाठी तब्बल २८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागांसाठी आता खुल्या प्रवर्गातून १८ जानेवारी रोजी निवडणूक होत असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निवडणूक झालेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आकडेमोड करण्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागात आता शेकोटीवर सध्या निवडणुकीच्याच गप्पा रंगत आहेत.
शिवसेना वर्चस्व सिद्ध करेल
भंडारा विधानसभा क्षेत्रातील १४ जागांपैकी शिवसेना ११ जागांवर शर्यतीत आहे. या निवडणुकीत शिवसेना नक्कीच वर्चस्व सिद्ध करेल. जिल्ह्यात इतर ठिकाणीही शिवसेनेचे उमेदवार लढतीत असून, जिल्हा परिषदेत आमची महत्त्वाची भूमिका राहील. -नरेंद्र भोंडेकर, आमदार
काँग्रेसला सत्ता स्थापनेएवढे संख्याबळ
मिनी मंत्रालयावर काँग्रेस सत्ता स्थापेल एवढे संख्याबळ पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत आम्हाला मिळणार आहे. मतदारांनी अधिकाधिक काँग्रेसलाच पसंती दिली आहे. यासोबतच नगरपंचायतीतही आम्हीच वर्चस्व सिद्ध करू. -मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
निवडणुकीत राष्ट्रवादीच बाजी मारणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे येईल. नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत विजयाकडे नेणारी आहे. गतवेळी चार तालुक्यांत राष्ट्रवादीकडे एकही सदस्य नव्हता. तेथेही मोठे संख्याबळ राहील. -नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
भाजपच सत्ता स्थापन करेल
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात भाजपला जवळपास २० जागा मिळतील. त्यामुळे भाजपच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाने ही निवडणूक आम्हाला सोपी गेली. -शिवराम गिऱ्हेपुंजे, जिल्हाध्यक्ष भाजप