आज जागतिक चिमणी दिन
भंडारा : पशु-पक्षी ही जंगलाची शान व गौरव आहे. मानवाप्रमाणे त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यापैकीच एक म्हणजे चिमणी हा पक्षी आहे. रखरखत्या उन्हात सावलीसाठी व चिमूटभर दाण्यासाठी चिमणी भटकताना दिसून येते. मात्र, वाढते प्रदूषण शेतातील वाढता कीटकनाशकांचा वापर ग्लोबल वार्मिंग मोबाइल मनोऱ्यांचा रेडिओलहरींमुळे चिमणीसारखा पक्षी संकटात आला आहे.
या लहानशा जिवाला वाचविण्यासाठी जागतिक पातळीवर २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. या चिमण्यांची संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. या पर्यावरणाच्या संतुलनात अतुलनीय वाटा ठेवणाऱ्या चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणातील चिमणी या अनमोल संपत्तीचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी व नागरिक पुढाकार घेऊन उन्हाळ्यात त्यांच्यासाठी आपल्या घराच्या छतावर चारा-पाण्याची व्यवस्था करतात. घरी किंवा इमारत बांधतांना चिमण्यांसाठी एक विटाची तरी जागा सोडावी, जेणेकरून त्यांच्या घरची सोय होऊन वादळ पावसापासून त्यांची सुरक्षाही होईल. अशा कार्यात सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वतः ही जगा व दुसरं नाही जगू द्या, असा संदेश देत, चिमण्यांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. चिमणी दिनानिमित्त ग्रीन हेरिटेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयत्नही सुरू आहेत.
बॉक्स
पुढाकाराची गरज
पशु-पक्षी कुठलाही असोत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक मानवाने घेतली पाहिजे. आज जागतिक चिमणी दिनी प्रत्येकाने त्यांच्या संरक्षणाबाबत काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून, घराच्या छतावर दाणे व पाण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून या छोट्यासा जीव या सृष्टीत वावरू शकेल.
मो.सईद शेख, अध्यक्ष ग्रीन हेरिटेज, भंडारा