भंडारा : माजी मंत्री परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाला मंगळवारी रात्री १:३० ते २ वाजताच्या सुमारस अपघात झाला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र वाहनाचे नुकसान झाले. परिणय फुके हे अन्य वाहनात होते. साकोलीच्या बसस्थानकाजवळच हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराहून परत येताना डॉ. परिणय फुके यांच्या ताफ्यामध्ये त्यांच्या वाहनासह अन्य वाहनेही होती. त्यांचे वाहन पुढे होते. मागे असलेल्या एमएच ४०, सी ००९ क्रमांकाच्या वाहनात त्यांचा स्वीय सहायक आणि कॅमेरामन होते. भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांची अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथील प्रचारसभा आटोपल्यावर गावकऱ्यांशी चर्चा करून रात्री उशिरा ते लाखनीकडे परत निघाले होते.
दरम्यान साकोलीच्या बसस्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्गवर फुके यांचे वाहन पुढे निघून गेल्यावर त्यांच्या ताफ्यातील एमएच ४०, सी ००९ क्रमांकाचे वाहन डिव्हायडरवर चढून महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. या संदर्भात साकोलीचे पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, अपघातासंदर्भात आपल्याकडे कोणीही तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसात घटनेची नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. चालकाला डुलकी आली असावी, त्यामुळे नियंत्रण सुटून वाहन डिव्हायडवर चढले असावे, असा अंदाज महामार्गवरील टायरच्या मार्किंगवरून लावला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
या संदर्भात परिणय फुके यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ताफा मार्गावरून जात असताना समोरून ट्रिपलशिट तीन युवक मद्यधुंद अवस्थेत पुढे आले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन डिव्हायवडवर चढले, अशी माहिती त्यांनी दिली.