मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खासगी जमिनीतून आतापर्यंत मुरुम उत्खनन करण्याचा प्रकार सुरु होता. आता मुरुम तस्करांनी महसूल साज्यातून व झुडपी जंगल परिसरातून रात्रीदरम्यान यंत्राने मुरुमाचे सर्रास उत्खनन करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील मेहगाव व पचारा शिवारात उघडकीस आला आहे.महसूल व वनविभागाचा तळापर्यंत कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. पारदर्शक प्रशासन व विकासाच्या बाता करणाऱ्यांचे येथे पितळ उघडे पडले आहे. मुरुम तस्कारांनी तालुक्यात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला असतांना जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे.तुमसर, मोहाडी तालुक्यातून राष्टÑीय महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. रस्ता बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात मुरुमाची गरज आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात मुरुमाचे मोठे साठे भूगर्भात आहेत. लाखो ब्रास मुरुमाची गरज आहे. नियमानुसार जिल्हा प्रशासनाकडे मुरुमाची लीज कंत्राटदारांनी मागितली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळतांना विलंब लागत आहे. पुन्हा जेवढी गरज तितकी लीज तात्काळ मिळतांनी तांत्रीक अडचणी निर्माण होत आहे. स्थानिक स्तरावर काहींना हाताशी पकडून नियमबाह्य मुरुम उत्खनन सर्रास सुरु करण्यात आले आहे.मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर मेहगाव व पचारा शिवारातील महसूल व वनविभागाची झुडपी जंगलाची जागा आहे. त्या जागेतून रात्रीला यंत्राच्या मदतीने मुरुमाचे सर्रास उत्खनन गत महिनाभरापासून सुरु आहे.मेहगाव शिवारात वनविभागाच्या हद्दीतील काही मोठी झाडे मुरुम तस्करांनी कापली आहेत. रात्रभर मुरुम तस्करांचा येथे धुमाकूळ सुरु आहे. काहींनी खाजगी जमिनीतून मुरुम काढण्याची परवानगी दिली आहे. शासकीय मालकीच्या महसूल व वनविभागाच्या जमीनीकडे मुरुम तस्कारांची नजर गेली आहे. मेहगाव शिवारात स्मशानघाट परिसरात मुरुम तस्कारांनी अक्षरक्ष: जमीन पोखरुन काढली आहे. रेती पाठोपाठ तुमसर तालुक्यात आता मुरुम उत्खननाला सुगीचे दिवस आले आहेत. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी आहेत. वनविभागाचे कर्मचारी असतांना मुरुम तस्करांची येथे रॅकेट सक्रीय आहे. महसूल व वनविभागाने मुरुम तस्कारांपुढे नांगी टाकल्याचे दिसून येते.सदर प्रकाराबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतांना महसूल व वनविभाग मात्र अनभिज्ञ दिसत आहे. हा सर्व नेटवर्क चालविणारे एक रॅकेट सक्रीय असल्याचे समजते. रेती व मुरुम हा सध्या नगदीचा व्यवसाय बनला असून या प्रकाराला वरदहस्त असल्यानेच हा व्यवसाय येथे फोफावला आहे. राष्ट्रीय महामार्गात जाणाºया मुरुमाचे आॅडीट होणार असल्याचे समजते. त्यामुळे मामा तलाव, मालगुजारी तलाव खोलीकरण करण्याचा नावाखाली मुरुम उत्खनन करण्याची परवानगी शासन स्तरावरुन देण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.