: खासदारांसह गावकऱ्यांची मागणी
लाखांदूर : ग्रामपंचायत अथवा महसूल विभागाच्या अतिक्रमण पंजी अभिलेखात एकाही घराच्या अतिक्रमणाची नोंद नसतांना एका तलाठ्याने हेतुपुरस्पर अतिक्रमणाच्या नावाखाली पूर बाधितांच्या मदत यादीतून डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर आरोप तालुक्यातील इटान येथील पुराने बाधित व शासन मदतीपासून वंचित कुटुंबांनी केला असून सबंधित कुटुंबांना मदतीसाठी खासदार सुनील मेंढे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
ऑगष्ट महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराने नदीकाठावरील इटान गावाला पुराचा जबर तडाखा बसला होता. या पुरामुळे येथील जवळपास २७ घरे पुर्णत: कोसळले होते तर अधिकत्तम घरांची अंशत: पडझड झाली होती. मात्र पुरबाधीत घरांचे सदोष पंचनामे करतांना येथील तलाठ्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली हेतुपुरस्पर २७ पैकी १५ कुटुंबांना शासन मदतीपासून वंचित केल्याचा आरोप क्षतीग्रस्त कुटुंबानी केला आहे.
या आरोपकर्त्या कुटुंबांमध्ये गंगाधर चाचेरे, हरिश्चंद्र चाचेरे, भोजराज घरड़े, राजकुमार घरडे, पितांबर मेश्राम, टिकाराम बावने, दिवाकर बावने, वासुदेव दिघोरे, देवराम बावने, मुखरु बावने, मुकेश बावने, विश्वनाथ चाचेरे,भोलाराम बावने, मंगेश घरड़े व शामराव दिघोरे आदिंचा समावेश आहे.
दरम्यान, मदतीपासून वंचित ठरलेली १५ कुटुंबे अतिक्रमीत असल्याचा ठपका ठेवतांना सदर घरांची ग्रामपंचायत अथवा महसूल विभागाच्या अतिक्रमण पंजी अभिलेखात कोणतीच नोंद नसल्याने मदतीपासून वंचित कुटुंबांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.सदर घटनेची दखल घेत वंचित कुटुंबांना शासन मदत मिळण्यासाठी खासदाीर सुनीन मेंढे व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून वंचित कुटुंबांना मदतीची मागणी केली आहे.