महावितरण कंपनीने थकीत बिलासाठी सवलत जाहीर केली होती. त्यात अत्यल्प शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. पैशाअभावी या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. गत दोन वर्षांपासून शेतकरी संकटाने बेजार आहे. कोरोना संकटाने शेतकऱ्यांची वाट लावली. पोट भरायचे की वीजबिल भरायचे? हा गहन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला. गत खरिपातील पूर्ण बोनस मिळू शकला नाही. उन्हाळी धानाची रक्कमसुद्धा शासनावर थकीत आहे. त्यामुळे शेतकरी वापरलेल्या विजेचा भरणा करण्यास असमर्थ ठरला आहे. परिणामी चूलबंद खोऱ्यांतील अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बॉक्स
वीजपुरवठा खंडित करू नका
पालांदूर येथील महावितरण कार्यालयात ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी शेतकऱ्यांसह भेट देऊन वीज कापणीची समस्या जाणून घेतली. हप्ताभरात शासनाकडून धान खरेदीचे पैसे येण्याची शक्यता आहे. त्या पैशातून वीजबिल शेतकरी भरेल. त्यामुळे वीज कापणीचा धडाका थांबवावा, असे आवाहन महावितरणला केले.
थकीत शेतकऱ्यांनी किमान बिलाच्या चाळीस टक्के रक्कम भरावी. थकीत शेतकऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही थकीत बिलाची रक्कम न मिळाल्याने नाइलाजाने वीज कापली जात आहे. वरिष्ठ स्तरावरून आलेल्या पत्रानुसार थकीत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
- मयंक सिंग, सहायक अभियंता महावितरण कार्यालय पालांदूर