देवानंद नंदेश्वर भंडारावैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवेसाठी निकड लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील एकूण ११ अस्थायी पदांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सदर अस्थायी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुन्हा आरोग्य सेवेत रुजू होणार आहेत. परिणामी कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील भार कमी होऊन आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात बळकट होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ एप्रिल २०१७ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळ, नागपूर यांच्या अधिपत्याखाली भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर दोन उपजिल्हा रुग्णालय येतात. या रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. मात्र त्यांची संख्या कमी आहे. कायमस्वरूपी असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या रुग्णांचा भार कमी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने या दोनही रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरली.या अस्थायी पदांना १ आॅक्टोंबर २०१६ ते २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर करार संपुष्टात आल्याने दोनही उपजिल्हा रुग्णालयात अस्थायी डॉक्टर व कर्मचारी सेवेतून भारमुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी नोकरी सोडल्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. सचिन बाळबुध्दे यांच्या खांद्यावर रुग्णालयाचा भार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थीरोगतज्ज्ञ व प्रसूती रोगतज्ज्ञ हे तुमसर येथे आठवड्यातून दोनदा येत असतात. तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले होते.त्यांनी आश्वासनाची पुर्तता केली. जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्यात.-चरण वाघमारे, आमदार, तुमसर मोहाडी
उपजिल्हा रुग्णालयातील ११ अस्थायी पदांना मुदतवाढ
By admin | Published: April 21, 2017 12:34 AM