भंडारा : नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग भंडारा-गाेंदियापर्यंत विस्तारण्याचे नियाेजन राज्य अर्थसंकल्पात शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पूर्व विदर्भातील दोन जिल्ह्यांच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे या महामार्गाचे नामकरण करण्यात आले आहे. या महामार्गाचा विस्तार करून ताे नागपूर ते भंडारा-गाेंदिया आणि नागपूर ते गडचिराेली असा करण्याचे नियोजन राज्य अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. या महामार्गामुळे राज्याच्या पूर्वेकडील दाेन जिल्हे मुंबई-पुण्याशी जलदगती मार्गाने जाेडले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ व भाजीपाला पिकाला या महामार्गामुळे माेठी बाजारपेठ उपलब्ध हाेणार आहे.
विजय दर्डा यांनी केली हाेती समृद्धी महामार्ग विस्ताराची मागणी
मुंबई येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘लाेकमत’ इन्फ्रा काॅन्क्लेव्ह-२०२१ मध्ये लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी या महामार्गाच्या विस्ताराची मागणी केली हाेती. रस्ते एकमेकांशी जाेडले जातात तेव्हा विकासाची दालने उघडली जातात. त्यासाठी हा मार्ग भंडारा-गाेंदियापर्यंत विस्तार करण्याची मागणी त्यांनी केली हाेती. याच इन्फ्रा काॅन्क्लेव्हमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महामार्ग भंडारा-गाेंदिया-गडचिराेलीपर्यंत जाेडण्याची घाेषणा केली हाेती. राज्य अर्थसंकल्पात ही घाेषणा प्रत्यक्षात उतरली आहे. माजी खासदार विजय दर्डा यांच्या विशेष पाठपुराव्याने या महामार्गाचा विस्तार हाेत असल्याने भंडारा- गाेंदिया जिल्ह्यात आनंद व्यक्त हाेत आहे.