भंडारा : नाशिक येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन प्रणालीची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी साकोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन पाईप व प्रणालीची तपासणी करणे व उपाययोजना सुचविण्यासाठी ही जिल्हास्तरीय समिती काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्थांचे प्राचार्य या समितीचे सदस्य असतील. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण संस्थेचे यू. आर. खाटोडे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ऑक्सिजन पाईपची तपासणी करण्यासाठी औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतील तांत्रिक मनुष्यबळाचे पॅनल तयार करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. या पॅनलला तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
तांत्रिक मनुष्यबळाच्या सहाय्याने जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील संपूर्ण ऑक्सिजन प्रणालीचा कालबध्द कार्यक्रम आखून तपासणी होणार आहे. या तपासणीवेळी गळती असल्यास अथवा पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्यास त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल विचारात घेऊन जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत.
बॉक्स
तीन शासकीय व १८ खासगी रुग्णालयांत प्रणाली
जिल्ह्यात तीन शासकीय व १९ खासगी रुग्णालयांत प्राणवायू प्रणाली कार्यरत आहे. या सर्व रुग्णालयांची तपासणी समिती करणार आहे. यात सर्वाधिक ऑक्सिजन पॉईंट भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात आहेत. आयसोलेशन बिल्डींग, मुख्य इमारत तिसरा मजला, पेईंग वार्ड, नेत्रचिकित्सा वार्ड असे मिळून ऑक्सिजनचे १४२ पॉईंट आहेत. यासोबतच साकोली रुग्णालय २० व तुमसर रुग्णालयात ५० पॉईंट आहेत. या सर्व ठिकाणची तपासणी समिती करणार आहे. जिल्ह्यात असलेल्या खासगी रुग्णालयांतील प्राणवायू प्रणालीची तपासणीही ही समिती तांत्रिक मनुष्यबळामार्फत करुन घेणार आहे.
कोट
ऑक्सिजन गळती व प्रणालीची तपासणी करण्यासाठी समिती अध्यक्षांनी कालबध्द कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांना पूर्वसूचना देण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या तपासणीसाठी तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त होताच त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- संदीप कदम
जिल्हाधिकारी