भंडारा : भंडारा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जवाहरनगर आयुध निर्माणी कंपनीमध्ये शनिवारी (27 जानेवारी) सकाळी 8:30 वाजता स्फोट झाला. या स्फोटात एका कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अविनाश मेश्राम (48) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
आयुध निर्माणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजतापासून पहिली पाळी सुरू झाली होती. या पाळीतील काम सुरू असताना सी एक्स विभागात दुर्घटना घडली. काम सुरू केल्यानंतर अडीच तासानंतरच प्रचंड स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने आयुध निर्माणी मध्ये प्रचंड खळबळ उडाली. स्फोटानंतर आग लागल्याने तैनात असलेले अग्निशामक दलाचे पथक बचाव कार्यासाठी धावले. त्यानंतर तातडीने आग आटोक्यात आणली.
या अपघातामुळे आयुध निर्माणीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. परिसरालगतच आयुध निर्माणीची वसाहत देखील आहे. आगीवर आणि दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यात आले असून त्याचे कारण शोधले जात आहे. हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने कोणालाही जाण्यास मज्जाव आहे.