केशोरी : शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानपीक, मक्कापीक विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, देण्यात आलेला कालावधीत अनेकदा ऑनलाईन नोंदणी करण्याची साइड व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३० मेपर्यंत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने ऑनलाईन नोंदणीकरिता संकेतस्थळ तयार करून १ मे ते ३० जूनपर्यंत चालणाऱ्या धानपीक, मक्कापीक खरेदीसाठी रब्बी हंगामातील धान व मक्का विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा, नमुना आठ, बँक पासबुकची झेराॅक्स प्रत अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३० एप्रिलला दिली होती. परंतु, या कालावधीत साइड बरोबर चालत नव्हती. त्यामुळे अनेक शेतकरी या ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे आदिवासी विकास महामंडळ रब्बी हंगामातील धान घेणार किंवा नाही अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून या भागात कोरोनाचा विस्फोट होऊन संचारबंदी लावण्यात आली होती. या लॉकडाऊन कालावधीत शेतकरी बाहेर पडण्यास घाबरत होते. त्याचबरोबर महामंडळाने दिलेले संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० मेपर्यंत वाढविण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले, विनोद बाबूराव गहाणे, योगेश पाटील नाकाडे यांनी केली आहे.
मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलन
जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे, तसेच लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी बाहेर पडता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आदिवासी विकास महामंडळाने रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी नोंदणी करण्याला मुदतवाढ द्यावी, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.