यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे. वेळेवर सातबारा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा रोष तलाठी कार्यालयावर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे शेतकऱ्यांनी सातबारा वेळेवर मिळत नाही म्हणून एका महिला तलाठ्याला तलाठी कार्यालयाला कुलूप लावून जेरबंद केल्याची घटना घडली. हे असे प्रकार एकट्या साकोली तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अनेक गावांत घडत आहेत. तांत्रिकदृष्ट्या अडचणीच्या असलेल्या या सातबारा उताऱ्यामुळे तलाठी हतबल झालेले आहेत, मात्र प्रशासनाकडून अशा कुठल्या सूचना आलेल्या नाही ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकाची नोंदणी करता येत नाही, त्या शेतकऱ्यांची नोंदणी तलाठ्यांनी करावी. त्यामुळे शेतकरी व तलाठी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत. हा आदेश यावर्षीचाच असून यात थोडीशी शिथिलता द्यावी. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन पीक नोंदणी झाली नाही त्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी तलाठ्यांनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, तर जुन्याच पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावे व शासकीय धान्य खरेदी केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली नोंदणीची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवा
धान खरेदी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना नोंदणीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. मात्र बरेच धान खरेदी केंद्रावर केंद्रचालकांच्या जवळच्या माणसांची आधीच नोंदणी केलेली असते. परिणामी शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.