रंजित चिंचखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड ( सिहोरा ) : उन्हाळी धान खरेदीला शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाईन करण्यासाठी दोन दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ही डेडलाईन माहीत नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. सिहोरा परिसरात उन्हाळी धान मोठ्या प्रमाणावर असून, शेतकऱ्यांमध्ये याविरोधात नाराजीचा सूर आहे. सातबारा ऑनलाईन करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
उन्हाळी धान कापणीच्या उंबरठ्यावर आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने धान कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सिहोरा परिसरात शासकीय धान खरेदी केंद्रांना आधीच शासनाने मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी सुरुवातीलाच सातबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात सातबारा ऑनलाईन करण्यासाठी दोन दिवसांची डेडलाईन देण्यात आली होती. मे महिन्याच्या एक तारखेपासून धान खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
अवघ्या दोन दिवसांची डेडलाईन शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. हजारो शेतकऱ्यांना ही डेडलाईन खटकणारी ठरली आहे. डेडलाईनच्या दोन दिवसात अनेक शेतकऱ्यांनी तलाठ्यांचे कार्यालय सातबारा उतारासाठी गाठले. यामुळे तलाठ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे. अनेक तलाठी होम क्वारंटाईन असल्याने सातबारा मिळाले नाहीत. प्रत्यक्षात दोन दिवसात हजारो सातबारा देता येत नाहीत. शासनाच्या दोन दिवसांच्या डेडलाईनने शेतकरी व तलाठ्यांचे डोके चक्रावले आहे. तलाठी कार्यालयात गोंधळ सुरु झाला आहे. कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असले, तरी नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ कोरोना संसर्ग घरापर्यंत नेणार आहे. दरम्यान, शासकीय आधारभूत केंद्रावर गोपनीयरित्या अनेक सातबारा केंद्र संचालकांनी ऑनलाईन केले आहेत. सिहोरा परिसरात यंदा डावा कालवा अंतर्गत पाणी वितरण करण्यात आले आहे. ४ हजार हेक्टर आर शेतीत धानाची लागवड करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागासोबत करारबद्ध असणाऱ्या एकही शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन झाले नाहीत. या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा घाट आहे. दरम्यान, दोन दिवसात ज्या शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन झाले आहेत, अशा शेतकऱ्यांची नावे प्रकाशित केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांचे सातबारा ऑनलाईन झाले असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत. सातबारा ऑनलाईन करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम, भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शीतल चिंचखेडे, विनोद पटले, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे व शेतकऱ्यांनी केली असून, चुल्हाड बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
कोट
उन्हाळी धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा करण्याकरिता मुदतवाढ मिळणार आहे. राज्यातील महाआघाडीचे शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगला पाहिजे. सातबारा ऑनलाईन करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी पत्रव्यवहार सुरु केला असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- राजू कारेमोरे, आमदार, तुमसर
कोट
१ मेपासून उन्हाळी धान खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात दोन दिवसांची सातबारा ऑनलाईन करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली आहे. हे शक्यच नाही. शेतकऱ्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न होत असल्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- चरण वाघमारे, माजी आमदार, तुमसर