पालांदूर : उन्हाळी धान खरेदी मुदतीत होऊ शकली नाही. मुदतवाढ मिळूनही धान खरेदी होणे शक्य नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धान खरेदीची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. मात्र, बारदाना तुटवड्याने संपूर्ण जिल्हा धान खरेदीत मागे आहे. प्रशासन स्तरावरून गरजेनुसार बारदानाची मागणी वारंवार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धान खरेदीचा अंदाज घेत बारदानाचा लेखाजोखा प्रशासनाने मांडला आहे. परंतु शासन स्तरावरून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने भंडारा जिल्ह्याला अपेक्षित बारदाना मिळत नाही. ४० लाख बारदानाची मागणी केली असताना केवळ १० लाख बारदाना जिल्ह्याला मिळाला आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रांना बारदाना पोहोचू शकला नाही. शेतकरी दररोजच आधारभूत केंद्रात जाऊन चौकशी करत आहेत. विहीत वेळेत धान मोजणी अशक्य वाटत असल्याने शेतकरी स्वतःच्या हक्कापासून दूर जात आहेत. खरेदी केंद्रावरील जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
आधारभूत केंद्रावरील धान्य खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली आहे. आता १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यात वाढीव मुहूर्ताची माहिती ५ जुलैला आधारभूत केंद्रांना पुरविण्यात आली. त्यात बारदानाची समस्या उभी झाल्याने १५ जुलैपर्यंत धान मोजणे शक्यच नसल्याचे वास्तव भंडारा जिल्ह्यात उभे झालेले आहे. बोनस अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. गरजू शेतकरी माहिती घेण्याकरिता बँकेत चकरा मारत आहेत. बँक कर्मचाऱ्यांना बोनस जमा झाले का विचारतात. मात्र, याचे उत्तर मिळत नाही. या अफलातून कारभाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
कोट
मागणीनुसार बारदाना मिळत नसल्याने धान खरेदी प्रभावित झाली आहे. तीन दिवसांपूर्वी केवळ तीन हजारच बारदाना मिळाल्याने बारदाना संपला आहे. शेतकरी रोजच मोजणीकरिता विचारणा करीत आहेत. मात्र, बारदानाअभावी मोजणीचे संकट आले आहे.
प्रेमराज खंडाईत, ग्रेडर
धान खरेदी केंद्र, पालांदूर.
कोट
बारदाना केव्हा मिळेल हे सांगणे अनिश्चित आहे. प्रयत्न सुरू आहेत. बोनसची अर्धी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसात शेतकऱ्यांना बोनसची रक्कम खात्यात वर्ग केली जाईल.
गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.