कोंढा कोसरा : पवनी तालुक्यात आधारभूत धान्य खरेदीचे नव्याने खासगी संस्थांना अधिकार मिळाल्यामुळे आता जोमाने खरेदी सुरु झाली आहे. परंतु, धान खरेदी करताना मोठ्या प्रमाणात केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून, कुणी विरोध केला तर धान खरेदी बंद करण्याचा इशारा दिला जातो.
धान खरेदी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. मात्र, खरेदी संस्थांचा मनमानी कारभार सुरू आहे. इतकेच नाही तर आता गोडावूनचे भाडेसुद्धा मनमानीपणे वसूल केले जाते तसेच हमालीच्या नावावर शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. प्रति पोत्यामागे ३५ ते ५० रुपये वसूल केले जात आहेत. तालुक्यातील काही खरेदी संस्था अशा आहेत की, ज्यांनी सर्व विक्रम मोडले असून, त्यांनी धान खरेदीसाठी त्या संस्थेत सभासद नोंदणी म्हणून एक हजार रुपये भरणे शेतकऱ्यांना बंधनकारक केले आहे. जो सभासद होणार नाही, त्याचे धान खरेदी केले जाणार नाही किंवा केले तर पैसे दिल्याशिवाय लाट एंट्री होणार नाही. धान खरेदीसाठी प्रशासन खरेदी संस्थांना दोन म्हणजे ३७ रुपये प्रतिक्विंटल व ११.४० रुपये अनुसंगिक ख़र्च म्हणून देते. म्हणजेच एकंदरीत ४८.४० रूपये प्रतिक्विंटल देऊनसुद्धा शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप होत आहे.