साकोली (भंडारा) : एक वर्षापासून फेसबुकवर फ्रेंड्स असलेल्या दोन अल्पवयीन मुला-मुलीचे प्रेम जडले. प्रेमात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. मुलीला खासगी रुग्णालयात आणल्यावर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. दोन्ही अल्पवयीन असल्याने साकोली पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयीन आदेशाने बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
साकोली तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील १७ वर्षांचा मुलगा व १६ वर्षांची एक मुलगी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकतात. वर्षभरापूर्वी फेसबुकवर दोघांनीही एकमेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्यानंतर प्रोफाइल पिक्चर बघून दोघांत जिवापाड प्रेम जडले. एकमेकांना मेसेज, व्हॉट्सॲप चॅटिंगमधून ते शरीरानेही फारच जवळ आले. असे काही महिने चालत राहिले. बुधवार, २६ जुलै रोजी मुलीला तिच्या कुटुंबीयांनी आजारावरील उपचारासाठी शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हॉस्पिटलने ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचा खुलासा केला व पोलिसांना माहिती दिली. पीडित मुलीच्या परिवाराने गुरूवारी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ३७६ (२), (एन), ३८६ (२), (जे) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अन्वये कलम ३, ६ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
मुलांना स्मार्टफोन देणे टाळा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर साकोली पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या शालेय पाल्यांना स्मार्टफोन न देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी केले आहे.