मुखरू बागडे
पालांदूर (भंडारा) : श्रद्धेला मोल नाही, असे म्हणतात ते अगदी खरे ठरले आहे. पालांदूर येथील मूळचे बडोले दाम्पत्यानी म्हातारपणात शिवभक्तांसाठी भव्यदिव्य आकर्षक शिव मंदिर उभारले आहे. पालांदूर येथील बाजार चौकात लाखनी रोड निमगाव फाट्याच्या पोटात अत्यंत आकर्षक, सुशोभित, देखणे शिवमंदिर येणाऱ्या जाणाऱ्यांना खुणावत आहे. २७ मार्चपासून तो शिवभक्तांकरिता मोकळे होत आहे.
बाळकृष्ण व वनिता बडोले या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी शिवभक्तीच्या प्रभावाने सुमारे ३० ते ३५ लक्ष रुपये पदरचे खर्च करून शिवभक्तांकरिता शिवमंदिर उभारले. शिव मंदिराचा घट, सुरेख आकर्षक व देखणा आहे. पालांदूर येथे एवढे भलामोठे शिवमंदिर यापूर्वी नव्हते. कदाचित भंडारा जिल्ह्यातसुद्धा एवढे आकर्षक शिवमंदिर नसावे.
श्रद्धा मनुष्याला शांती प्रदान करते. हीच शांती आयुष्याला सुखसमृद्धीची नांदी पुरविते. उभं आयुष्य श्रम उपसून आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या समवेत इतरही शिवभक्तांनी एकत्रित यावे. सर्वधर्म समभावाच्या नात्याने जगावे. या उदात्त हेतूने पुणे येथे नोकरी करून मूळ गावी स्थिरावलेले बाळकृष्ण बडोले व त्यांच्या अर्धांगिनी वनिता बडोले यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी अगदी अडीच वर्षात सुरेख शिवमंदिर शिवभक्तांसाठी तयार झालेले आहे. त्यांच्या या श्रद्धेला, श्रमाला मुलगा योगेशचे सहभाग लाभले, हे विशेष!
मंदिराची प्राणप्रतिष्ठा रितीरिवाजाने अत्यंत धार्मिक वातावरणात २८ मार्च रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत हरिभक्त परायण लांबकाने महाराज व त्यांच्या संचासह पार पडली. महाआरती नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य सरिता विजय कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजित आहे. २७ मार्चला सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हरिपाठाचे नियोजन केले. २९ मार्चला दुपारी १२ ते ३ गोपालकाला व महाप्रसाद कार्यक्रम आयोजिला आहे.