कामे होणार तरी कशी ? : कृषी विभागांतर्गत ११२ पदे रिक्त, कामाचा अतिरिक्त ताण अधिकाऱ्यांवरभंडारा : जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात एकुण ११२ पदे रिक्त आहेत. विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे केंद्र तथा राज्य शासनाकरवी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अडथळा निर्माण होत आहे. रिक्त पदांचा फास संबंधित योजनांना बसत असून याचा प्रत्यक्ष परिणाम शेतकऱ्यांना जाणवू लागला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याची ओळख मागासवर्गीय जिल्हा म्हणून केली जाते. जिल्ह्यात अनेक विभागांतर्गत अनेक पदे रिक्त आहेत. त्यात कृषी विभागही मागे नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील १२ कार्यालयातील एकुण ११२ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदे तालुका कृषी अधिकारी पवनी अंतर्गत रिक्त आहेत. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान, सोयाबीन यासह अन्य नगदी पिके घेण्यात येतात. केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ विविध योजना राबविण्यात येतात. यात अनुदानावर आधारित बियाण्यांपासून तर शेतकरी जनता अपघात पर्यंतच्या विविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतात. मात्र कृषी विभागांतर्गत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सेवक, तंत्रज्ञ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यासह बहुतांश कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामांचा ताण दिवसेंगणिक वाढत आहे. खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कामे उरकविण्यावर भर दिला जात आहे. (प्रतिनिधी)१२ कार्यालयांतर्गत ११२ पदे रिक्तजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील एकुण १२ कार्यालय आहेत. यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ३८ पदे मंजूर असून ११ पदे रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा कार्यालयात ३२ पैकी नऊ तर साकोली येथे २० पैकी नऊ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालय भंडारा अंतर्गत ५० पदे मंजूर असून आठ पदे रिक्त आहेत. तसेच मोहाडी येथे १५, तुमसर १३, पवनी १६, साकोली आठ, लाखनी सहा तर लाखांदूर येथे १० पदे रिक्त आहेत. जिल्हा मृदा चाचणी व मृदा संवर्धन अधिकारी कार्यालयांतर्गत दोन तर तालुका फळ रोपवाटिका भंडारा व आंधळगाव कार्यालयांतर्गत एकूण पाच पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांचा योजनांना फास
By admin | Published: September 11, 2015 12:54 AM