भंडारा : उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. नर जातीच्या या बछड्याचे पोट फुगलेले असल्याने विषबाधा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे.
उमरेड- पवनी- करांडला अभयारण्यात रविवारी जंगल सफारीसाठी काही पर्यटक गेले होते. चिचगाव जंगलातील कंपार्टमेंट क्र. २२६ मध्ये त्यांना वाघ मृतावस्थेत दिसून आला. या प्रकाराची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रचंड गोपनियता बाळगली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतावस्थेत आढळलेला वाघ हा प्रसिद्ध जय वाघाचा बछडा राजा उर्फ चार्जर असल्याचे पुढे आले. या पट्टेदार वाघाचे पोट फुगलेल्या अवस्थेत असल्याने विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. भंडारा येथील वन विभागाचे वरिष्ठ आधिकारी चिचगाव जंगलात दाखल झाले आहेत.