भंडारा : शहरात दुचाकींची संख्या हजारोंच्या घरात असून त्यावर लावण्यात येत असलेला आरसा शोभेची वस्तू ठरला आहे. कित्येक दुचाकीस्वार हा आरसा घरीच काढून ठेवत असतात. दरम्यान, वाहतूक शाखेने दुचाकीला आरसा नसलेल्या ४६ दुचाकी धारकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.
शोरूममधून दुचाकी घेतल्यानंतर दुचाकीला दोन आरसे लावूनच येतात. पण त्यानंतर बहुतांश दुचाकीस्वार हा आरसा काढून घेतात. परिणामी मागील वाहन येत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच बहुतांश अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. आरसा काढण्यासंदर्भावरून कारवाई होत असली तरी या नियमाला बगल देणारेही भरपूर आहेत.
विशेष म्हणजे दुचाकीस्वाराच्या उजव्या हातावरील आरसा असणे गरजेचे आहे. मात्र तोही आरसा नसतो. भंडारा शहरात गत काही महिन्यात वाहतूक शाखेने याबाबत विशेष मोहीम राबविली नाही. २०० रुपये दंड दुचाकी किंवा चारचाकी ग्राहकाला मिळत असताना शोरूममधूनच वाहनाला दोन आरसे लावलेले असतात. दोन्ही स्वरूपाच्या वाहनांना आरसा नसला तर २०० रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. गत ११ महिन्यात ४६ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
दुचाकीचालकांना हे बंधनकारक
वेगमर्यादा पाळणे, वाहनाची नेमप्लेट स्पष्ट वाचता येईल अशा रीतीने ठेवणे बंधनकारक आहे. तसेच हयगयीने वाहन चालवू नये, वाहनाचे पीयूसी, परवाना, विमा तसेच इतर कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. हेल्मेटचा वापर करावा.