: चांदपूर, बपेऱ्यात पोलिसांचा बंदोबस्त
रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाशिवरात्रीच्या यात्रेचे आयोजन रद्द करण्यात आले असले तरी यंदा मात्र फिलगुडच्या वातावरणात भाविकांनी सिहोरा परिसरात महाशिवरात्रीच्या यात्रेला निरोप दिला आहे. या परिसरातील चांदपूर, बपेरा देवस्थानात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करण्यात येत आहेत. रात्रीची संचारबंदी, अनेक शहरांत आठवडाभराचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक निर्बंध घालत आहेत. सणासुदीत नागरिकांची गर्दी राहत असल्याने कार्यक्रमाच्या आयोजनावर अंकुश लवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असताना भाविकांनी मात्र फिलगुडच्या वातावरणात महाशिवरात्रीच्या यात्रेला निरोप दिला आहे.
सिहोरा परिसरात असणाऱ्या चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने ट्रस्टने पाच दिवस देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक भाविकांनी लांब अंतरावरून देवाचे दर्शन घेतले. दरम्यान, देवस्थान बंद असल्याने परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली नाही. याच परिसरात असणाऱ्या बपेरा गावाच्या शेजारी असलेल्या वैनगंगा, बावणथडी नदीच्या संगमतीरावर शिवभक्त हजेरी लावत असल्याने गर्दी वाढत आहे. गायखुरी देवस्थानात नवस फेडण्यासाठी भाविक येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी आधीच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. भाविकांचे लोंढे गायखुरी देवस्थानच्या दिशेने निघाले असता पोलिसांनी त्यांना शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे सांगितले; परंतु आस्थेने आलेले भाविक घराच्या दिशेने परतले नाहीत. डाव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात येत असल्याने याच कालव्यावर अनेक भाविकांनी नवस फेडण्याचा निर्णय घेतला आहे. खुल्या आभाळात शिवभक्तांनी नवस फेडले. दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर फिलगुडच्या वातावरणात भाविकांनी घरची वाट धरली आहे.
जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी घोषित केली असल्याने दिवस असताना कधीही लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते, यामुळे भाविकांनी गावाची वाट धरली आहे. याशिवाय आंतरराज्यीय सीमेवर तपासणी वाढविण्यात आली असल्याने टेन्शन वाढणार असल्याच्या कारणावरून नवस फेडल्यानंतर भाविकांचे लोंढे गावाकडे परतले आहेत. त्यानंतर गावातच छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करीत गर्दी टाळण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.
आधीच परतलेच भाविक :- सिहोरा परिसरातून मोठ्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी मध्यप्रदेशातील पंचमढी देवस्थानात गेले होते. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन स्तरावर अनेक निर्बंध घालण्यात येत असल्याने महाशिवरात्रीच्या पंधरा दिवसांपूर्वीच दर्शनासाठी भाविक गेले होते. भाविक दर्शन घेऊन आधीच परतले आहेत. मध्यप्रदेशातील जिल्हा सीमा बंद व कडक तपासणी करण्याचा अनुभव भाविकांनी घेतला आहे. गावात परतल्यावर या भाविकांनी साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करीत महाशिवरात्रीला निरोप दिला आहे.