देवानंद नंदेश्वर
भंडारा : लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला व नापीकीला कंटाळून स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.
ही घटना रविवारी (दि. ३०) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नागेश घनश्याम वाघाये (६५, रा. केसलवाडा वाघ), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, शासनाकडून कर्जमाफी होईल या भोळ्या आशेवर त्याने कर्ज घेतले होते. मात्र शासनाने कर्जमाफीची कोणतीही घोषणा न केल्यामुळे त्यांनी २ दिवसापूर्वी हातउसने करून सोसायटीचे कर्ज भरले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
शेतात गत काही दिवसापासून वीज नसल्यामुळे उन्हाळी हंगामात लावलेले धान करपण्याच्या मार्गावर आहे. धान पिकाला विविध रोगाने ग्रासले असल्याने उसनवारीने घेतलेले पैसे परत कसे करायचे, या विवांचनेत राहून त्यांनी स्वतःच्या शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर केसलवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा बराच आप्त परिवार आहे.