दयाल भोवते, लोकमत न्यूज नेटवर्क, लाखांदूर: उन्हाळी धान पीक लागवडीसाठी ठेक्याने केलेल्या शेतजमिनीत रोवणी पूर्व चिखलणीसाठी पाणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १९ मार्चच्या संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खैरणा शेतशीवारात घडली. मात्र तब्बल ३ तास उशिरा रात्री ९ वाजता दरम्यान सदर घटना उघडकीस आली.
बाबुराव रामचंद्र मेश्राम (४५) रा. दोनाड असे घटनेतील मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. या शेतकऱ्याने खैरना येथील गोपाळा मेंढे नामक शेतकऱ्यांची मालकी दीड एकर शेती उन्हाळी धान लागवडीसाठी ठेक्याने घेतली होती. शेतात उन्हाळी धान लागवडपूर्व चिखलणी साठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी ते शेतावर गेले होते. घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून लाखांदूर पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह शुभविच्छेदनासाठी पाठविला.