पालांदूर (भंडारा) : पुतण्या बैल धूत असल्याचे बघून मदत करण्याच्या इराद्याने काकाही तलावात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारला दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली. विलास सीताराम झलके (३५) रा. धानला/खराशी. ता. लाखनी असे मृताचे नाव आहे.
विलासला पोहता येत नव्हते. परंतु तलावात पाणी किती असेल याचा अंदाज नसल्याने खोल पाण्यात गेला. पुतण्याने प्रसंग ओळखत पाण्याबाहेर येत रोजगार हमीच्या मजुरांना जोरजोराने ओरडत घटनेची माहिती दिली. मजूर घटनास्थळावर दाखल झाले. मात्र त्याला वाचविण्यात यश आले नाही.
पंचनामा आटोपून पार्थिव शवविच्छेदनाकरिता लाखनी येथे पाठविण्यात आले. पालांदूर पोलीस पुढील तपास करीत आहे. विलासला आई, वडील, भाऊ, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. त्यांना सहा एकर जमीन आहे. मात्र वर्षातून एकच हंगाम होत असल्याने घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह चालवत असत. विलास हा अविवाहित होता. घटनेच्या दिवशी तो ऑनलाइन कामावर हजर होता.
गावात शोककळा पसरली
विलास मृदू स्वभावाचा असून दयाळू स्वभावाचा होता. तो अविवाहित असल्याने त्याच्याविषयी एकच हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वृद्ध वडिलांनी मुलाचे पार्थिव बघून हंबरडा फोडला. मजूरवर्गालाही अश्रू रोखता आले नाही. धानला /खराशी गावात शोककळा पसरली आहे.