भंडारा : धानपट्ट्यात रेशीम शेती यशस्वी होत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनात साकोली तालुक्यातील चारगाव येथील शेतकऱ्याने रेशीम शेतीतून प्रगतीचा मार्ग शोधला. एक एकर क्षेत्रातील तुती लागवडीवर महिनाभरात ३५ हजार ५०० रुपयांची कोष विक्री केली. विशेष म्हणजे धानपट्ट्यातील तुती रेशीमला उत्कृष्ट दरही मिळत आहे.
साकोली तालुक्यातील चारगाव येथे सुमंत पुस्तोडे यांची शेती आहे. परंपरागत धानशेती पिकवायचे. मात्र, काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना जिल्हा रेशीम कार्यालयाने मार्गदर्शन केले. प्रायोगिक तत्त्वावर आणि वातावरणाचा विचार करून तुती रेशीम लागवड केली. जुलै २०२१ मध्ये एक एकर क्षेत्रात त्यांनी तुतीची लागवड केली. ५ मार्चला १०० अंडीपुंजाचे कीटक संगोपन सुरू केले. महिनाभरात ४ एप्रिल रोजी त्यांनी ३५ हजार ५०० रुपयांच्या कोषाची विक्री केली. चारगाव येथील पुस्तोडे यांना ५०० रुपये प्रती किलोचा दर मिळाला. यासाठी त्यांना रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले, कीटक संगोपन काळात महेंद्र ढवळे यांनी मार्गदर्शन केले.
१०० अंडीपुंजातून ७३ किलो कोष
१०० अंडीपुंजातून ७३ किलो कोष उत्पादन सुमंत पुस्तोडे यांना झाले. विशेष म्हणजे शेवटी दोन फिडिंगला पाला कमी पडला. अशा परिस्थितीतसुद्धा त्यांना सरासरी चांगले उत्पादन झाले. पुस्तोडे यांनी यावर्षी तीन पीक घेतले. पहिले प्रायोगिक तत्त्वावर असल्याने १०० अंडीपुंजापासून २२ किलो कोष झाले. दुसऱ्या पिकात ५० किलो, तर तिसऱ्या पिकात आता ७३ किलो उत्पादन झाले आहे.
पर्यायी पीक म्हणून तुती लागवडीसाठी प्रयत्न
जिल्हा रेशीम कार्यालयांतर्गत मूलभूत सुविधा केंद्र जमनी येथे असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाते. रेशीम शेतीमध्ये एकदा लागवड केली की दहा-बारा वर्षे लागवड करण्याची गरज नाही. तुती लागवड तुती कलम व रोपाद्वारे करता येते. लागवड केल्यानंतर साडेचार ते पाच महिन्यांनंतर पहिले कीटक संगोपन सुरू करता येते. पहिल्या वर्षी २ ते ३ वेळा, दुसऱ्या वर्षीपासून कीटक संगोपन करून पाच ते सहा वेळा उत्पन्न मिळविता येते. त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यात पर्यायी पीक म्हणून तुती लागवडीचा प्रयत्न होत आहे.