भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे हे आजच्या मुलीच आपल्या वडिलांना सांगत आहेत. त्यामुळे होणारा पती हा डॉक्टर, इंजिनिअर, एखादा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठा कंत्राटदार असावा, अशीच अनेक मुलींची अपेक्षा दिसून येते. त्यामुळे शेतकरी मुलांना मुलींचा बापच नव्हे, तर मुलीही नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक समाजात आजही डॉक्टर मुलांनाच सर्वांत जास्त पसंती आहे. मात्र, असे असले तरी डॉक्टर मुलांचे प्रमाणही आज कमी आहे. बारावीनंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही कमी असल्याने तेथेही अतोनात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक सधन घरातील मुलांची इच्छा असूनही अनेकांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे अनेक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील मुलींना डॉक्टर नवरा पाहिजे असला तरी प्रत्येकाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी आजही शेतकरी माणूस असतानाही स्वतःची मुलगी मात्र एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या मुलाला देण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत नवरी मुलीचे वडीलही विचार करीत आहेत.
बॉक्स
माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही
शेतकरी नवरा असलाच तर माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही, असे मुलीचे वडील आधी ठरवून घेतात. मुलाची चांगली बागायती शेती, शेतीसोबत जोडधंदा, चांगले घर असेल तरच शेतकरी मुलांकडे पाहिले जाते. यासोबतच घरात कुटुंबात कोणकोण आहे, तसेच मुलगा निर्व्यसनी आहे का, घरातील लोक शिकले आहेत का, सोबतच मुलाचे शिक्षण, नोकरी या गोष्टीही पाहिल्या जातात. नोकरी असली तरीही शेती आहे का, हा अट्टहास मात्र अनेकांकडून धरला जातो.
बॉक्स
सर्वाधिक मागणी शासकीय नोकरीवरील मुलांनाच
१ मुलगा शासकीय नोकरीला आहे का, स्वतःचे घर आहे का, ग्रामीण भागातील मुलगी देताना मुलाला खाजगी का असेना, पण नोकरी आहे का, त्याचे फक्त शिक्षण कामाचे नाही तर तो किती कमावतो, स्वतःच्या घरालाही मुलीचे वडील प्राधान्य देत आहेत.
२ लग्नानंतर तो नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरात नोकरी करताना स्वतंत्र राहणार का, आई-वडील नको, भविष्याच्या दृष्टीने मुलीच्या नावावर घर, शेती करणार का अशीही चौकशी अनेक जण करीत असल्याची माहिती वधू-वर सूचक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
३ मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा वाढतच आहे. मात्र, काळानुसार बदल करण्याची गरज आता पालकांसमोर निर्माण झाली आहे. कमीत कमी अपेक्षा दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळींनी ठेवल्यास मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढणार नाही.
कोट
मुलगा सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरदार किंवा शेतकरी असला तरी चालेल. मात्र, मुलावर असणारे संस्कार, त्याची पार्श्वभूमी पाहूनच मुलांच्या लग्नाचा पालकांनी विचार करावा. आजच्या काळात प्रत्येकानेच सरकारी नोकरदाराची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तरी या मताविरोधात आहे.
तानाजी गायधने, महाराज, चिखली
कोट
माझा मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्या जोडीदाराचेही उच्च शिक्षण पाहूनच मुलांच्या लग्नाचा विचार करणार आहोत. मात्र, भौतिक सुखसुविधांपेक्षा मुलगा, त्याचे कुटुंब, सुसंस्कृतपणा पाहूनच योग्य निर्णय घेईन.
चुडामान हटवार, सहा. शिक्षक, मोहाडी.