भंडारा : शेतातील धानाची एका शेतकऱ्याने बळजबरीने कापणी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील एक शेतकरी चक्क विषाची बाटली घेऊन मंगळवारी येथील तहसील कार्यालयात पोहोचला. तत्काळ कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा त्याने दिला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिल्याने मोठा अनर्थ टळला.
मच्छिंद्र लक्ष्मण मेश्राम (वय ३२, रा. दहेगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना तालुक्यातील खैरी येथे शासनाकडून एक हेक्टर शेती मिळाली आहे. त्यात ते धानाची लागवड करतात. मात्र, काही वर्षांपासून गट नंबर १९७ अंतर्गत ०.२० हेक्टर शेतीवरून मच्छिंद्र आणि यादोराव बारसागडे, रा. चिचाळ यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतरही शेतीचा कब्जा सोडण्यास यादोराव नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी यादोराव यांनी धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार पोलिसांसह महसूल विभागाकडे करण्यात आली. मात्र, कोणतीच कार्यवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छिंद्रने मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय गाठले. त्याच्या हातात विषाची बाटली होती. संबंधितावर कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा दिला. हा प्रकार माहीत होताच तहसीलसमोर एकच गर्दी झाली. तहसील प्रशासनात एकच खळबळ उडाली. काही वेळातच त्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
यावेळी तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देविदास पाथोडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे उपस्थित होते. तहसीलदार मेश्राम यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषीविरोधात आवश्यक कारवाईची सूचना दिली.