मिताराम जितू मेश्राम (६५, रा. ढिवरवाडा) असे जखमीचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात असताना रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मितारामला करडीच्या आरोग्यवर्धिनी केंद्र उपचारासाठी आणण्यात आले. परंतु जखम खोलवर असल्याने सामान्य रुग्णालय भंडारा येथे जाण्याचा सल्ला दिला. सध्या भंडारा येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तुमसर वनविभागाचे वनाधिकारी अरविंद लुचे यांनी पालोराचे वनरक्षक हाके यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले. शुक्रवारी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर केला.
जखमी शेतकऱ्यास औषधोपचासाठी तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्या सरिता चौरागडे, के.बी. चौरागडे, ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे, अशोक मेश्राम, सोसायटीचे अध्यक्ष अतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.