काही दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे खरीप पिकाच्या आशेने जगत असलेला शेतकरी या वातावरणामुळे पूर्णतः हतबल आणि चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतो. या ढगाळ वातावरणामुळे तूर, मूग, गहू, लाखोरी यासोबतच भाजीपालावर्गीय पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांवर आलेली आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र या खरीप पिकांवर अवलंबून असते; परंतु या ढगाळ वातावरणामुळे या पिकांची खात्री शेतकऱ्याला अजिबात नाही, त्यामुळे आधीच कोरोना महामारीने हातातील काम गेलेला, मग धानाची शेती न पिकल्यामुळे वैतागलेला आणि आता खरीप पिकातून कुठलेही उत्पन्न होणार नाही, असे वातावरण असल्यामुळे शेतकरी पूर्णतः खचलेला पाहायला मिळत आहे.
यंदा तुरीच्या उत्पन्नात घट
पहेला परिसरामध्ये दररोज ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या तूर हे फुलोऱ्यावर आलेले आहे व फुलांचे शेंगांत रूपांतर होण्यासाठी थंडीची खूप आवश्यकता असते. ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे तुरीचे उत्पादन नक्कीच घटेल असा काही शेतीतज्ंज्ञाचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढलेली आहे .