पालांदूर : एकदा नव्हे दोनदा धान खरेदीला मुदतवाढ मिळूनही धान खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. २२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत शेतकरी धान मोजणीकरिता वेटिंगवर होता. मात्र धान खरेदी अपुरीच राहिली. आता पुन्हा धान मोजणी करिता शासनाच्या आदेशाची वाट बघणे सुरू आहे.
पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात धान खरेदी समस्येत आली आहे. उन्हाळी धान खरेदीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. आधी गोडाऊन समस्यानंतर बारदाना समस्या व आता मुदतीची समस्या भेडसावल्याने शेतकरी कंटाळलेला आहे. ऐन पावसात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. मोजणीकरिता खर्च अधिक येत आहे.
शासनासह प्रशासनाने अर्थात जिल्हा पणन कार्यालयाने धान खरेदीचे धोरण सकारात्मक न ठेवल्याने जुलै महिना धान खरेदीला उजाडला. शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बारदाना समस्या आजचीच नसून नियमित झाली आहे. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या बारदान्यातच खरेदीचे प्रयत्न सुरू झाले. असेच प्रयत्न पूर्वी झाले असते तर शेतकऱ्यासह आधारभूत केंद्रांनासुद्धा हायसे वाटले असते. परंतु नियमाच्या बांधीलतेमुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ कुणीही नियमात शिथिलता देऊ शकले नाही. त्यामुळे तब्बल मे, जून व जुलै धान खरेदीत अडकली. तरीही धान खरेदी होते की नाही ही एक समस्याच उभी झाली आहे.
चौकट
जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शासन-प्रशासनाच्या विरोधात आक्रोश अनुभवण्यात आला. सहनशीलतेच्या पुढे गेल्याने शेतकरी राजा हक्कासाठी रस्त्यावर आला. त्यानंतर राजकीय नेते त्यांच्या सोबतीला धावले. प्रशासनानेसुद्धा नमते घेत शेतकऱ्यांच्या समस्येची तीव्रता समजून घेतली. धान खरेदीच्या आदेश दिले. आता फक्त मुदतवाढीच्या आदेशाची प्रतीक्षा कायम आहे.
कोट
निसर्गाच्या अनेक हुलकावण्या स्वीकारीत महागाईचा मार खात धानाची शेती करावी लागते. धान पीक इतर पिकांच्या तुलनेत खर्चीकच आहे. परंतु शासनाचे हक्काचे आधारभूत केंद्र असल्याने शेतकरी धानाकडे अधिक लक्ष देत आहेत. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात आहे. पुढील उन्हाळी हंगामात निश्चितच धानाच्या हंगामात तूट निर्माण होईल. पर्यायी पिके लावली जातील.
हेमंत सेलोकर, प्रगतिशील शेतकरी, खुनारी