सालेभाटा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. अन्नदाता शेतकरी न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असून शेतकरी संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे.लाखनी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तर वीज वितरण कंपनीच्या भारनियमनामुळे कृषी पंपधारक वैतागले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे धनंजय लोहबरे यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण समोर सुरु केले आहे. लाखनी तालुक्यातील भारनियमन बंद करून २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच शासन नियमानुसार खरीप हंगाम २०१५-१६ मधील तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत मिळावी. या न्याय मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. १६ आॅगस्टला शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. परंतु समस्या मार्गी लागली नाही. मागण्यांसाठी शेतकरी संघटना पदाधिकारी धनंजय लोहबरे, माणिक टिचकुले, नंदलाल काडगाये, घनश्याम हजारे, रतीराम हजारे, गुणीराम वंजारी, दिनेश वासनिक, मनोज पटले, मोरेश्वर भुते, मोहन बुराडे, सुधाकर शेंदरे, सुरेश बोपचे, ताराचंद टिचकुले आदींनी साखळी उपोषण सुरू केले आहे. (वार्ताहर)
शेतकरी संघटनेचे साखळी उपोषण
By admin | Published: August 22, 2016 12:33 AM